जिते गावात निळे धूळ प्रकरण : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, ‘मल्लक’ला स्वेच्छा बंदीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:40 AM2018-01-25T01:40:48+5:302018-01-25T01:40:55+5:30
महाड औद्योगिक वसाहत परिसरातील जिते गावामध्ये ६ जानेवारी रोजी निळ्या रंगाची धूळ उडाली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सर्वत्र हाहाकार माजलेल्या परिस्थितीमध्ये जिते ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक वसाहतीचे महाड कार्यालय आणि औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि कारवाईची मागणी केली होती.
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक वसाहत परिसरातील जिते गावामध्ये ६ जानेवारी रोजी निळ्या रंगाची धूळ उडाली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सर्वत्र हाहाकार माजलेल्या परिस्थितीमध्ये जिते ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक वसाहतीचे महाड कार्यालय आणि औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मल्लक स्पेशालिटी या पिग्मेंट कारखान्याला दोषी धरून बंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार आता पुढील ७२ तासांत कारखाना प्रशासनाने कारखाना बंद करणे सक्तीचे असणार आहे. तसे न केल्यास कारखाना बंदीची संक्रांत येऊ शकते.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. पाणी प्रदूषित करणाºया विविध कारखान्यांवर नोटिसी आणि कारवायांचे सत्र सुरू असतानाच ६ जानेवारी २०१८ रोजी सकाळी जिते गावात वायुप्रदूषणाचा मुद्दा समोर आला. हे वायुप्रदूषण गॅस अगर धुरामुळे होणारे नसून ते रासायनिक धुळीमुळे झालेले वायुप्रदूषण होते. ६ जानेवारी रोजी सकाळी जिते गाव परिसरामध्ये निळ्या रंगाची रासायनिक धूळ उडाली होती. गावातील घर, घरांमधील चीज वस्तू, झाडेझुडपे, वाहन, रस्ता सर्वच या निळ्या रंगाच्या धुळीमुळे माखून गेले होते. यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता, तर जिते गावातील महमद बाबा दरेखान, समीर दरेखान या दोन व्यक्तींना उलट्या देखील झाल्या. संपूर्ण या घटनाक्रमामुळे जिते गाव परिसरात एकूण हाहाकार उडाला होता. ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
निळ्या रंगाचे धुळी प्रकरणी संपूर्ण गाव एक त्र येऊन ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहत कार्यालय, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तक्रार दिली होती. ग्रामस्थांचा उद्रेक वाढत होता. जिते गाव परिसरात जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता, तरी देखील ग्रामस्थांनी संयम पाळला. दोषींवर कारवाई करा या मागणीचा आग्रह धरत प्रशासनाला वेळ दिली. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड येथील उपप्रादेशिक कार्यालयाने जिते गाव परिसरातील आणि मल्लक स्पेशालिटी या कारखाना परिसरातील निळ्या रंगाच्या धुळीचे नमुने गोळा केला होते. या नमुन्याच्या आधारे प्रथमदर्शनी जिते गाव हद्दीत असलेला मल्लक स्पेशालिटी हा कारखाना दोषी ठरवण्यात आला होता.
या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाकडे मल्लक स्पेशालिटी कारखान्यावर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने मल्लक स्पेशालिटी या कारखान्याला स्वेच्छा बंदीची नोटीस बजावली.
या नोटिशीनुसार कारखानदाराने नोटीस मिळाल्यापासून पुढील ७२ तासांत कारखाना बंद करणे सक्तीचे असणार आहे. तसे न केल्यास कारखान्यावर अधिक कडक कारवाई होऊ शकते, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
निळ्या रंगाची धूळ
उडण्याची दुसरी घटना
निळ्या रंगाचे पिगमेंट बनवणाºया तीन कंपन्या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. त्यापैकी मल्लक स्पेशालिटी हा एक कारखाना आहे. हा कारखाना जिते गाव हद्द परिसरात असून साधारण दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे निळ्या रंगाची धूळ उडण्याची घटना घडली होती.
आंतरराष्टÑीय उत्पादन निर्यात करणाºया एका कारखान्याला निळ्या रंगाच्या धुळीचा फटका बसला होता. कारखान्यातील कामगारांचे आरोग्य आणि निळ्या रंगामुळे झालेल्या आर्थिक नुकसान प्रकरणी या कारखान्याने ठोस पावले उचलत नुकसान भरपाई देखील घेतली होती.
त्यामुळे अशा प्रकारे निळ्या रंगाची रासायनिक धूळ उडणे हे महाड औद्योगिक वसाहतीतील पहिले प्रकरण नाही. संबंधित शोध यंत्रणांनी अशा प्रकारच्या या वायू प्रदूषणाची गंभीर दखल घेत सक्तीच्या कारवाया करणे गरजेचे झाले आहे.
72तासांत कारखाना बंद करणे गरजेचे-
कारखान्यामध्ये उत्पादन घेतले जात असताना अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. यामुळे काही सेकंदापासून ते काही दिवसापर्यंतचा कालावधी या रासायनिक प्रक्रियांना द्यावा लागतो. ती या प्रक्रियेची गरज असते. त्यामुळे बंदीचे आदेश दिले असले तरी रासायनिक प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंतचा कालावधी देणे बंधनकारक असते. त्यानुसार स्वेच्छा बंदीचे आदेश देताना हा कालावधी दिला जातो. या कालावधीत कारखानदारांनी चालू असलेल्या उत्पादनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून उत्पादन थांबवायचे असते. नवीन प्रक्रिया सुरू करण्यास बंदी घातली जाते. याला स्वेच्छा बंदी असे म्हटले जाते. मात्र सुरू असलेले उत्पादन पूर्ण झाल्यानंतरचा स्वेच्छा बंदीच्या नोटिसीप्रमाणे कारखानदाराने पुढील उत्पादन थांबवून स्वत:हून कारखाना बंद करणे गरजेचे आहे. या बंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास कारखानदाराला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागते. स्वेच्छा बंदीच्या या कारवाईदरम्यान घडलेल्या घटनेचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधायचा असतो. त्यानुसार दुरुस्ती करून त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घेवून नंतर कारखाना सुरू करायचा असतो.