उरण येथील यूईएस शाळेचे संचालक मंडळ बेकायदेशीर, सह धर्मदाय आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:39 AM2019-08-13T01:39:37+5:302019-08-13T01:39:47+5:30
उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त यांनी दिला आहे.
उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांच्या तक्रारीवर दिला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे मात्र उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
उरण येथील युईएस संस्थेची बारावीपर्यंत शाळा आहे. १९७८ मध्ये स्थापन झालेल्या या तालुक्यातील नामांकित शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेची स्थापना झाल्यापासूनच नगराज शेठ हे संस्थापक अध्यक्ष म्हणून संस्थेचे कामकाज पाहात होते. त्यांनी शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त राखून शाळेला लौकिक मिळवून दिला होता. मात्र २००५ साली संस्थेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढू लागला. त्यामुळे वादविवादही होऊ लागले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या नगराज शेठ यांनी सदस्यत्वाचा नव्हे तर अध्यक्ष पदाचा १० जानेवारी २००५ रोजी राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी संस्थेचा कारभार मनमर्जीप्रमाणे चालविण्यास सुरुवात केली होती.
संस्थेत नगराज शेठ यांचे सदस्यत्व कायम असतानाही त्यांना अंधारात ठेऊन २००५ मध्ये संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने निवडीचा फार्स केला. संचालक आणि कार्यकारी संचालक मंडळ, सदस्य पदासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक न घेता तेच सदस्य, संचालक पदाची निवडीची प्रक्रिया २०१५ आणि आजतागायत कायम ठेवली आहे. संस्थेच्या या अन्यायकारी आणि बेकायदा निवडणूक प्रक्रियेविरोधात संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांनी मुंबई विभागाच्या धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
नगराज शेठ यांनी केलेली तक्रार चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर करण्यात आली आहे. तसेच त्यावर मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याची माहिती युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली. संचालक आणि कार्यकारिणी कमिटीच्या निवडणुकाही नियमानुसार झालेल्या असल्याचा दावाही जैन यांनी माहिती देताना केला आहे.
संचालक मंडळाचे विविध निर्णयही संस्थेसाठी अडचणीचे ठरणार?
या तक्रारीच्या सुनावणीनंतर २००५ मध्ये झालेल्या संचालक मंडळ, कमिटीची निवड बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांच्या तक्रारीवर दिला आहे.
२००५मध्ये कमिटीची निवडच बेकायदेशीर आहे.त्यामुळे तेंव्हापासून २०१५ पर्यंत कायम करण्यात आलेले संचालक मंडळ, कार्यकारी मंडळही बेकायदेशीर आणि अनधिकृत ठरत असल्याचा निर्वाळाही आयुक्तांनी निकाल पत्रात दिला आहे.
आयुक्तांच्या या निर्णयामुळे या दरम्यान संचालक मंडळाने घेतलेल्या विविध निर्णयही संस्थेसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून या प्रकरणी संस्थेचा कारभार पाहाण्यासाठी प्रशासक नियुक्तीच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र त्यामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.