पोलादपूर विद्युत वितरण विभागाकडे मंडळाचे दुर्लक्ष, विभागीय कार्यालयांची दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 01:16 AM2020-12-07T01:16:29+5:302020-12-07T01:16:48+5:30
Poladpur News : पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत.
पोलादपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूर कार्यालयात १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त असणारी पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याकरिता कर्मचारी व अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळात कामे करावी लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत. यापैकी ३६ पदे ही तांत्रिक विभागातील म्हणजेच लाइनमन सहायक अभियंता उपअभियंता दर्जाची पदे असल्याचे समजते. सबस्टेशनमध्ये ४ पदे मंजूर असून, पैकी २ पदे रिक्त आहेत, तर कार्यालयातील ८ पैकी ७ पदे रिक्त आहेत.
डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरमध्ये एकूण एकाहत्तर गावांतून १९ हजार ग्राहकांना या २१ कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवा अविरत अखंडित देण्याचे कार्य करावे लागत आहे. पोलादपूर तालुक्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २ कोटी रुपये एवढे आहे, असे असूनही पोलादपूर विभागाच्या कार्यालयांमध्ये असणारी दुरवस्था व विभागीय कार्यालयांमध्येही किमान नसणाऱ्या सुविधा पाहता, मंडळाकडून अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूरमधील दुरवस्थेस मंडळाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे.
वरध विभाग तीन दशकांपासून पोलादपूरकडेच
गेल्या ४ दशकांपासून महाड तालुक्यातील वरंध विभाग हा पोलादपूर लाच जोडला गेला असल्याने, या भागातील नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी अथवा बिले भरण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत असून, याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करूनही हा विभाग महाडला जोडण्याकरिता विद्युत मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल वरध विभागातील नागरिक आगामी काळात कधीही आंदोलनाचे हत्यार उपसतील, अशी मानसिकता या भागातील विविध गावांतील नागरिकांची आहे.