मुरुड : तालुक्यातील आगरदांडा जेट्टी परिसरात राजपुरी येथील एका बोटीने मच्छीमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लॅस्टिक कचरा हा बकेटमध्ये जमा करून खोल समुद्रात टाकण्याच्या तयारी असणाऱ्यांना रोखण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश आले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा खोल समुद्रात टाकण्याचा डाव फसला असून, प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश प्राप्त झाले आहे. समाजसेवक व माजी नगरसेवक गिरीश साळी हे आपल्या काही महत्त्वाच्या कामासाठी आगरदांडा जेट्टी येथून दिघीमार्गे श्रीवर्धनला जाणार होते. यावेळी बोटीची प्रतीक्षा करीत असताना त्यांना एक मच्छीमार नौका जेट्टीलगत लागून जाळ्यात अडकलेला प्लॅस्टिकचा कचरा हा बकेटमध्ये जमा करीत असताना दिसले. हे मच्छीमार जाळे खूप मोठे असल्याने या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा जमा झाला होता. यावेळी तेथील मच्छीमारांना गिरीश साळी यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा कचरा आम्ही जमा करून खोल समुद्रात टाकणार आहोत. त्यांच्या या उत्तराने साळी आवाक झाले प्लॅस्टिक कचरा पुन्हा किनाऱ्याला लागून कचऱ्याचे साम्राज्य पसरणार आहे. कारण खोल समुद्रात टाकणारा कचरा पुन्हा किनाऱ्यावरच येणार आहे. समुद्र किनारी कचरा पसरू नये यासाठी साळी यांनी तातडीने स्थानिक पत्रकारांशी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. पत्रकारांनी तातडीने आगरदांडा बंदराचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून तातडीने बोट मालकाला तंबी देण्यास सांगितले.यशोधन कुलकर्णी यांनी राजपुरी येथील बोट मालकाचा शोध घेऊन जाळीत अडकलेला प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात असणारा कचरा याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितले, अन्यथा आपणावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे संकेत दिले. बोट मालकाने सदरील कचरा जेटीवरून उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याने कचऱ्याचे साम्राज्य होण्यापासून किनारा बचावला आहे.
आगरदांडा जेट्टीवर प्लॅस्टिक कचरा जमा करणाऱ्या बोट चालकांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:14 AM