अलिबाग : कुलाबा किल्ल्याजवळील समुद्रात असणाऱ्या खडकाळ भागात उरण-करंजा येथील नमो:शिवाय मासेमारी बोट बुडाली. बोटीतील खलाशांनी बोटीतील लाइफ जॅकेट आणि बोयांच्या साहाय्याने पोहत वरसोली किनारा गाठून आपले प्राण वाचविले. खलाशी आणि बोटीवरील कामगार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. बोट बुडाल्याने बोटमालकाचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले.
नमो:शिवाय मासेमारी बोटींमधून वाचलेल्या खलाशांमध्ये वसंत बामा पाटील (नावाडी), धावू गोविंद तांडेल, गजानन अर्जुन जोशी, नितीन जनार्दन पाटील, उमाजी बालाजी पाटील, रूपेश जनार्दन पाटील, नारायण मंगळ्या कोळी आणि परशुराम शांताराम पाटील यांचा समावेश आहे. मासेमारी बंदी उठणार या आनंदाने रायगड जिल्ह्यातील कोळीबांधवांनी आपल्या बोटींची डागडुजी करून आठवडाभराचे लागणारे साहित्य, डिझेल आदी बोटींवर नेऊन ठेवले आणि आपल्या बोटी मासेमारीसाठी सज्ज ठेवल्या होत्या. १ आॅगस्टच्या पहाटे उरण-करंजा येथील बंदरातून मासेमारीसाठी बोटी निघाल्या. या बोटींच्या सोबत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राजेश प्रकाश नाखवा यांची आयएनडी एमएच ४७ एमएम २२३ नमो:शिवाय ही बोट मासेमारीसाठीची सामग्री घेऊन आठ खलाशांसह निघाली. ती वेळ सकाळी ४.३० वाजताची होती. नमो:शिवाय या बोटीचे इंजिन अचानक बंद पडले. या वेळी प्रसंगावधान राखून नावाडी आणि खलाशांनी बोटीतील नांगर आणि काही जाळी बोट थांबविण्यासाठी समुद्रात टाकली; परंतु याच वेळी समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे बोट एका जागेवर स्थिरावली नाही. लाटांचा मारा आणि वारा यांच्या कचाट्यात सापडलेली ही बोट अलिबाग समुद्रकिनाºयालगत असणाºया कुलाबा किल्ल्याच्या दिशेने सरकू लागली असतानाच नमो:शिवाय बोट कुलाबा किल्ल्यानजीकच्या खडकाळ भागातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने बोटीचा तळभाग फुटला आणि बोटीत पाणी शिरले.आता आपली बोट बुडणार हे लक्षात आल्यानंतर बोटीवर असणाºया खलाशांनी तातडीने बोटीत असणारे लाइफ जॅकेट आणि बोया यांची एकत्र बांधणी केली. त्यांच्याजवळ असणारे मोबाइल त्यांनी सोबत नेलेल्या प्लॅस्टिकच्या बरणीत टाकले आणि समुद्राच्या पाण्यात स्वत:ला झोकून दिले. ही वेळ सकाळी ६ वाजताची होती, तोपर्यंत समोर अलिबागचा किनारा या खलाशांना दिसला. त्यांनी त्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. समुद्राच्या लाटांवर आरूढ होत हे आठ खलाशी अलिबाग नजीकच्या वरसोली समुद्र किनाºयावर पोहोचले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी दाखल केले होते. आठही जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडले आहे.आमचा मासेमारी कालावधी दोन महिन्यांनी सुरू होणार म्हणून आमच्या बोटीची डागडुजी करून मासेमारीला जाण्यासाठीची तयारी केली. सकाळी बोट निघाली आणि घरी गेलो. दोन तासांनी बोटीतूनच खलाशांचा फोन आला. आगोदर खलाशांची चौकशी केली. सर्व सुखरूप असल्याचे समजल्यानंतर आम्ही ही घटना मत्स्यव्यवसाय विभागाला कळविली. माझी मासेमारी बोट बुडाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.- राजेश नाखवा, मालक, नमो:शिवाय बोटअचानक बंद पडलेले बोटीचे इंजिन आणि लाटांच्या माºयाने बोट भरकटली जाऊन बोटीच्या तळाला खडक लागला आणि आमची बोट फुटली. आम्ही लगेचच सर्व लाइफ जॅकेट आणि बोया एकत्रित बांधले. त्याचबरोबर आम्ही बोट बुडाल्याचा संपर्क मालकाला केला. त्यासाठी आम्ही आमचे मोबाइल पाण्यात भिजू नये म्हणून एका प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवले होते. हिंमत न हारता आम्ही सर्वांनी एकजुटीने एकमेकाला धीर देत अलिबाग वरसोलीचा किनारा गाठला.- राजेश पाटील, खलाशी