बोर्ली-मांडला : अरबी समुद्रात अतिवृष्टी व वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खाते व रायगड जिल्हा प्रशासनाने व्यक्त केल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छिमारांनी सुरक्षिततेसाठी मुरुड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या आश्रय घेतला आहे.मुरुड, एकदरा समुद्रखाडीत देखील सर्व नौकांना मासेमारी अर्धवट सोडून माघारी त्वरित येण्याचे आदेश रायगड जिल्हा प्रशासनाने दिले असल्याने सर्व नौका आगरदांडा, दिघी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. सध्याचा काळ मासेमारीचा महत्त्वाचा काळ असून मच्छिमारांचे मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रचंड नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया मासेमार बांधवांनी व्यक्त केली. पावसाचा मागमूसही नसून हवामान खात्याचे अंदाज फोल ठरत असल्याने मच्छिमारांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुरक्षितता व जीवितहानी टाळण्यासाठी शासनाने दिलेले आदेश सर्व मच्छीमार बांधव पाळत आहेत. मात्र यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून वादळाच्या शक्यतेने शेकडो नौका या बंदरात नांगरण्यात आल्या असून सोमवारपर्यंत या परिसरात वादळी हवामान किंवा पाऊस झालेला नसल्याने वादळी शक्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सोमवारी देखील प्रखर ऊन आणि घामाच्या धारा अनेकांच्या कपाळावर दिसत होत्या. वादळी पावसाचा कुठेही मागमूसही दिसत नव्हता. (वार्ताहर)
वादळामुळे नौका किनाऱ्यावर
By admin | Published: October 13, 2015 2:04 AM