लोकमत न्यूज नेटवर्क मुरुड : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी पहाटेपासून मुरुड तालुक्यात पावसाची सुरुवात झाली. किमान चार तास पाऊस पडल्याने सर्वत्र धुके पसरले होते. पाऊस जरी रिमझिम बरसत असला तरी याचा मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही बोटी किनाऱ्याला शाकारल्या होत्या. परंतु बहुतांश बोटी या खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या. खोल समुद्रात वारा व पावसाचे प्रमाण वाढताच सर्व बोटींनी किनारा गाठला आहे. आगरदांडा बंदर, राजपुरी बंदर व खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.
खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीवर सामान भरण्यासाठी किमान ८० हजार रुपयांपर्यंत खर्च होत असतो. आठ दिवसांचे सामान, सर्व जीवनावश्यक वस्तू भरण्यात येतात. परंतु अचानक अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मिळालेली मासळी घेऊन सर्व बोटी सुरक्षित किनाऱ्याला आल्या आहेत. या वेळी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बोट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी अवकाळी पावसाचा जोर खोल समुद्रात जास्त होता तसेच दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते, कसाबसा आम्ही किनारा गाठला आहे, असे सांगितले.
सर्व बोटींवर अल्प मासळी मिळाल्यामुळे त्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. मासळी बाजारात मासळी आली, परंतु मासळीचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात लिलाव करताना चढ्या भावाने लिलाव घ्यावा लागल्याने मासळी बाजारातसुद्धा मासळीचे दर वाढले होते. सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस हा कोकणातील मच्छीमारांची डोकेदुखी ठरत आहे. शासनाची कोणतीही मदत मिळत नसतानासुद्धा मच्छीमार आपल्या जीवनाचा गाडा हाकत आहेत.
मच्छीमारी करणे कठीण होत आहे - मनोहर बैलेयाबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. एका बोटीला खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी किमान ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो त्यामध्ये फक्त १५ ते २० हजार रुपयांची मासळी मिळते. प्रत्येक ट्रिपला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे मच्छीमारी करणे खूप कठीण होत आहे असे सांगितले. अशीच परस्थिती राहिली तर मच्छीमार कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाकडून मिळणारी डिझेल परताव्याची रक्कम २०१८ पासून ते आजतागायत मिळालेली नाही, अशी खंत बैले यांनी व्यक्त केली.