आगरदांडा : कोकणाला लाभलेल्या ७२० सागरी किनाऱ्यावर सुमारे पाच लाख मच्छीमार समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यंदाचे वर्ष मच्छीमारांना अनेक संकटांवर मात करून मोठ्या कठीण परिस्थितीवर मात करून काढावे लागले आहेत. मात्र, १ आॅगस्टपासून यांत्रिकी बोटी पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या असून, नवीन सुरू होणाºया या हंगामात काहीतरी आपली आर्थिक परिस्थती सुधारेल, अशी आशा येथे व्यक्त करण्यात येत आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, मजगाव, नांदगाव आदी ठिकाणी ६५० यांत्रिकी बोटी असून, नव्या हंगामाची ते सुरुवात करणार आहेत. १ आॅगस्टपूर्वीच मच्छीमारांनी आपल्या मोठ्या होड्यांची दुरुस्ती, कलर, मशीनचे काम पूर्ण केले होते. आता मोठ्या होड्यांमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, बर्फ, मसाले असा रोजच्या भोजनासाठी लागणारा सर्व किराणा माल भरून मोठ्या होड्या खोल समुद्रात आठ दिवस मासळी पकडण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे १ आॅगस्टपासून सुरुवात होणाºया या हंगामात मासे कसे मिळतात, यावरच त्यांचे जीवनमान अवलंबून राहणार आहे.मुरुड तालुक्यातील सर्व होड्या शनिवारपासून हळूहळू रवाना होत आहेत. शासनाने मुंबईमधील मोठे मासळी मार्केट उघडणे खूप आवश्यक असल्याचे मत अनेक मच्छीमार लोकांनी व्यक्त केले आहे. कारण खोल समुद्रात पकडलेली मासळी विकण्यासाठी मार्केट मिळणे खूप गरजेचे व महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मच्छीमारीची प्रथमच सुरुवात होत असून, मोठ्या उत्साहात बोटी रवाना झाल्या आहेत.समुद्रात मासे पकडण्यासाठी एका होडीला ६० ते ७० हजार रुपये खर्च होतो. स्थानिक मार्केटला भाव मिळत नसल्याने साधा डिझेलचा ही खर्च निघत नाही. तरी शासनाने आम्हाला मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठा मासळी बाजार उपलब्ध करू दिला पाहिजे आणि लॉकाडाऊन पूर्णता बंद केले पाहिजे, तरच कोळीबांधव सावरेल.- दशरथ मकु, मच्छीमार