श्रीवर्धनमधील बोडणी घाटमार्ग धोकादायक, वळणावरील रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:58 AM2019-08-11T01:58:12+5:302019-08-11T01:59:13+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट धोकादायक असून वळणावरच रस्ता खचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

The Bodni Ghat road in Srivardhan lost the dangerous, diverting road | श्रीवर्धनमधील बोडणी घाटमार्ग धोकादायक, वळणावरील रस्ता खचला

श्रीवर्धनमधील बोडणी घाटमार्ग धोकादायक, वळणावरील रस्ता खचला

googlenewsNext

 - संतोष सापते
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट धोकादायक असून वळणावरच रस्ता खचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील चालक व स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोडणी घाटातील वळण रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. वळण रस्त्याच्या डाव्या बाजूला जवळपास २० ते २५ फूट खोल दरी आहे. खचलेल्या रस्त्यालगत बांधकाम खात्याने रिफलेक्टर लावले आहेत. मात्र, त्यामुळे अपघात रोखण्यात किती मदत होईल, याबाबत शंकाच व्यक्त होत आहे. कारण म्हसळ्याकडून येणारा वाहनचालक तीव्र उतार उतरत असतो, त्याला पुढील वळणाची कल्पना नसते. बोडणी घाट प्रथमदर्शनी सोपा वाटत असला तरी या मार्गावर नव्याने येणाऱ्या चालकांना वेगाचा अंदाज येत नाही, त्यामुळे गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.

माणगाव, साई, म्हसळा मार्गे श्रीवर्धनकडे येताना ४८ कि.मी. व माणगाव, गोरेगाव, खामगाव, म्हसळा मार्गे श्रीवर्धन असे ५६ कि.मी. अंतर आहे. हा संपूर्ण घाटमार्ग आहे. श्रीवर्धन शहरात प्रवेश करण्यासाठी बोडणी घाटाशिवाय दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. म्हसळा, वाडांबा, जांभूळ, वडघर, बोडणी मार्गे श्रीवर्धन हा एकमेव मार्ग आहे. वडघर ते बोडणी पाच कि.मी. अंतर आहे. या ठिकाणी तीव्र उतार व वळणावळणाचा रस्ता आहे. म्हसळ्याकडून श्रीवर्धनकडे जाताना बोडणी घाटात डाव्या बाजूला वळून जावे लागते. बोडणी घाटातील एक रस्ता मेघरेकडे जातो व दुसरा श्रीवर्धनकडे जातो. वाहनचालकास प्रथम मेघरे रस्ता निदर्शनास येतो. बोडणी घाटात रस्त्याच्या कडेला मोठे वडाचे झाड आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे अपेक्षित होते; परंतु तसे न झाल्याने चालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे.

बोडणी घाट हा अपघात प्रवण क्षेत्र आहे. बोडणी रस्त्याची रुंदी जवळपास १७ फुटांची आहे. बोडणी घाटातून मुंबई व इतर उपमहानगराकडे जाणारी वाहतूक चालते. राज्यातील सर्व पर्यटक याच घाटातून श्रीवर्धन शहरात प्रवेश करतात. श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे, बापवली, गुलदे, निरंजनवाडी या ग्रामीण भागातील वाहतूक बोडणी घाटातून सतत चालते. पावसामुळे बोडणी घाटातील वळणावरील दरी खचण्यास सुरुवात झाली आहे.

आगामी काळात निरंतर पाऊस झाल्यास सर्व रस्ता खचू शकतो. त्यासाठी तत्काळ प्रतिबंधक उपाय योजना करण्याची गरज आहे. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. तसेच दरीच्या बाजूला भिंत बांधणे शक्य झाले नाही तर किमान चार फुटांपर्यंत उंच कठडे बांधणे आवश्यक आहे. कारण तीव्र उतारामुळे चालकांचा ताबा सुटल्यास किंवा पावसामुळे वाहन घसरल्यास ते थेट दरीत कोसळणार नाही व जीवितहानी टाळता येईल.

श्रीवर्धन तालुक्यात आॅगस्ट महिन्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते. पर्यटन हा श्रीवर्धनमधील उभारी घेणारा व्यवसाय आहे. श्रीवर्धन तालुक्यातील असंख्य लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून आजमितीस रोजगार उपलब्ध होत आहे. बोडणी घाट तत्काळ दुरुस्त होणे आवश्यक आहे. अन्यथा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- वसंत यादव,
सभापती, श्रीवर्धन नगरपरिषद


दररोज बोडणी घाटातून जावे लागते. घाटातील तीव्र उतार धोकादायक आहे. आता बोडणी रस्ता खचतोय, त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते
- संदीप गुरव,
सचिव, एसटी कामगार सेना,

बोडणी घाट वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीवर्धन ते म्हसळा विक्रम रिक्षाची बोडणी रस्त्यावरून सतत वर्दळ असते. घाट खचण्यास सुरुवात झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. घाटरस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास प्रवास धोकादायक ठरू शकतो.
- अविनाश कोळंबेकर,
अध्यक्ष, विक्रम रिक्षा संघटना

बोडणी घाटात दहा मीटर रस्ता खचला आहे. या ठिकाणी अपघात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. रस्त्याच्या कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू आहे. पाऊस कमी झाल्यानंतर खचलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.
- श्रीकांत गनगणे,
अभियंता, बांधकाम विभाग,

श्रीवर्धन आगाराच्या सर्व बसेस मुंबईकडे मार्गक्रमण करताना बोडणी घाटातून जातात. प्रवासी सुरक्षेला एसटीने सदैव प्राधान्य दिले आहे. बोडणी घाटातील वळणावर रस्ता खचतोय, अशी तक्रार कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीने केली आहे. तरी सर्व चालकांना रस्त्याची परिस्थिती बघून पुढे मार्गस्थ होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- शर्वरी लांजेकर, स्थानकप्रमुख, एसटी आगार, श्रीवर्धन
 

Web Title: The Bodni Ghat road in Srivardhan lost the dangerous, diverting road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.