नागोठणे : शिहू ग्रामपंचायत हद्दीत भ्रष्टाचाराचे गुन्हे यापूर्वी नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल झाले असतानाच याच हद्दीत २८ शेतकऱ्यांनी बोगस सातबारा उतारे बनवून २०११ - १२ मध्ये २,१५० आंबा झाडांची नोंद करीत एक लाख ५२ हजार १०० रु पये सरकारकडून लाटले असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे शिहू तलाठी सजाकडून या सर्व उताऱ्यांची गाव दप्तरी नोंदच झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी, पेण यांनी स्पष्ट केले आहे. २०११- १२ मध्ये झालेल्या आंबा नुकसान क्षेत्राची भरपाई रक्कम कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार ६ जून २०१२ अन्वये मार्च २०१३ मध्ये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली होती. या निधी वितरणात शिहू ग्रामपंचायत हद्दीतील शिहू, गांधे, चोळे या गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर कोकण विभागाचे कृषी सहसंचालक यांचेकडून कसून चौकशी करण्यात आली व त्यात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर पेण येथील सहाय्यक कृषी अधिकारी शामकांत पाटील यांना निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे नळ पाणीपुरवठा योजना व बनावट सातबारा प्रकरणात यापूर्वी अडकलेले शिहू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अमृत कुथे हे या प्रकरणात सुद्धा असल्याचे तलाठी सजा, शिहू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाच्या कोकण कार्यालयाकडून झालेल्या चौकशीनंतर या २८ शेतकऱ्यांनी बनावट सातबारा उतारे व आठ अ चे उतारे तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच शासन निधीचा अपहार केला आहे, त्यामुळे त्यांचे विरुध्द योग्य ती कार्यवाही करावी असे कोकण विभागीय कृषी सहसंचालकांनी २५ आॅगस्ट २०१५ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, रायगड यांना सूचित केले आहे.(वार्ताहर)
बोगस शेतकऱ्यांनी लाटले सरकारचे दीड लाख
By admin | Published: September 26, 2015 11:08 PM