- गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमींना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहेत. यापैकी बऱ्याचजणांना डोळे गमवावे लागले आहेत. दुर्घटनेनंतर तातडीने मदत पोहोचविण्यास कंपनी व्यवस्थापन कमी पडल्याचे दिसून आले. विळभागड येथे पॉस्को कंपनीजवळ क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा.लि. कंपनी आहें. या कंपनीत बॉयलर सिलेंडरचा स्फोट होऊन ठरा जण गंभीररित्या भाजले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पॉस्को कंपनी व्यवस्थापनाची व सरकारी रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला हलविण्यात आले.
जखमींमध्ये आशिष, सुनील रेगोटे, शुभम जाधव, सूरज उमटे, किशोर कारगे , चेतन कारगे , राकेश हळदे , कैलास पडावे , रूपेश मानकर , सुरेश मांडे , प्रसाद नेमाणे , वैभव पवार , राजेश जाधव , आकाश रक्ते, मयुर तामणकर , रजत जाधव, प्रमोद म्हस्के, सुनील पाटील यांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना माहिती मिळताच तातडीने त्यांचे सहकारी स.पो नि प्रियंका बुरुंगले, पोलिस स्वप्निल कदम व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मदत केली.