उरणमध्ये हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांचा सिडकोवर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:52 PM2023-08-28T17:52:33+5:302023-08-28T17:53:16+5:30
उरण- पनवेल मार्गावरील साकव धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
उरण : उरण -पनवेल मार्गावरील हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी सोमवारी (२८) द्रोणगिरी येथील सिडकोच्या कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला होता.
उरण- पनवेल मार्गावरील साकव धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी फुंडे आणि बोकडवीरा येथे हाईटगेटही उभारण्यात आले आहेत.या दोन्ही हाईटगेटवर वाहने धडकुन अनेक अपघात घडले आहेत.मागील आठवड्यातच फुंडे हायस्कुल जवळच्या हाईटगेटला टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघाताच्यावेळी टेम्पोच्या मागे असलेल्या दुचाकीवरील बोकडवीरा गावातील अंकुश पाटील व त्यांची सात वर्षाची मुलगी मनविता यांचा अपघात झाला आहे.
या अपघातात बापलेक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सिडकोने आर्थिक मदत करावी तसेच अपघातांना जबाबदार असलेले हाईट गेट मोकळे करावेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या द्रोणगिरी येथील कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्यांवर सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग,वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुमारे पाच तास चर्चा केली.सकारात्मक चर्चा होऊन अखेर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी सिडकोचे अधिकारी हनुमंत नहाने,एम. एम. मुंढे,नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ,वाहतूक उपनिरीक्षक संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार आदी विभागाचे अधिकारी व बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच अपर्णा पाटील, कामगार नेते भूषण पाटील,विजय पाटील, संतोष पवार यांच्यासह माजी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.