उरण : वीर वाजेकर कॉलेजमध्ये शनिवारी (१२) भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथान यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागातर्फे रंगनाथान यांच्या प्रेरणादायी आत्मचरित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी प्रदर्शन आयोजित करण्याची भूमिका स्पष्ट केली. या पुस्तक प्रदर्शनाबाबत तसेच वाचनाच्या उपयुक्ततेबद्दल सदर कार्यक्रमात डॉ.आमोद ठक्कर, डॉ.संदीप घोडके, प्रा.राम गोसावी,डॉ.श्रेया पाटील यांनी आपले विचार आणि अनुभव व्यक्त केले.वाचन चळवळीची आवश्यकता विषद करून प्राचार्य प्रल्हाद पवार म्हणाले की, “श्यामची आई वाचल्यावर किंवा आमचा बाप आणि आम्ही वाचल्यावरच आपल्याला आपले आई-वडील अधिक चांगल्या प्रकारे कळतात आणि त्यांच्या कष्टांची जाणीव निर्माण होते.पुस्तकांमुळे जगाकडे पाहण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन विकसित होतो.”
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथालय परिचर कमल बंगारे आणि नर्मदा रोज यांनी परिश्रम घेतले.सदर प्रदर्शनामुळे वाचनाची प्रेरणा निर्माण झाल्याचे मत श्रुती आसवले आणि इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.उपक्रमात प्राणिशास्त्र आणि इतर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.