महाड : दीर्घ सुट्टीनंतर महाड तालुक्यातील शाळा १७ जूनला सुरू होत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुस्तके पोचवण्याचे काम सध्या सुरू आहे.
कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सर्व दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणावे यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा माध्यमांतील शाळांचा यात समावेश आहे. त्यानुसार महाड तालुक्यातील ३५३ शाळांतील मुलांसाठी ७८ हजार १५१ पुस्तके आली आहेत. पहिली ते पाचवीतील ८ हजार ८३ मुलांना तर सहावी ते आठवीतील ५ हजार ८६४ मुलांना असा एकूण १३ हजार ९४७ मुलांना या पुस्तकांचा लाभ होणार आहे. शाळा क्र. ५ पाच येथून आलेली पुस्तके प्रत्येक केंद्र स्तरावर वितरीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता चांदोरकर यांनी सांगितले. शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. शाळेत पहिल्या दिवशी पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक ही पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.च्ग्रामीण भागात पुस्तके पोहोचवण्याचे काम सुरू झाले असून पहिल्याच दिवशी तालुक्यातील ३५३ शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या१३ हजार ९४७ विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचा लाभ घेता येणार आहे.