बूमची सक्ती मच्छीमारांच्या मुळावर
By Admin | Published: December 9, 2015 12:57 AM2015-12-09T00:57:47+5:302015-12-09T00:57:47+5:30
मासळी व्यावसायिक आणि खलाशांमध्ये चार महिन्यांपासून पावर ब्लॉकवरुन (बूम) सुरु असलेला वाद ठरावीक खलाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
मधुकर ठाकूर, उरण
मासळी व्यावसायिक आणि खलाशांमध्ये चार महिन्यांपासून पावर ब्लॉकवरुन (बूम) सुरु असलेला वाद ठरावीक खलाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. दोघांच्या वादामुळे मासळी व्यवसायावर परिणाम होत आहे. खलाशीवर्गाच्या बूमच्या हट्टापायी मासेमारीचा महत्त्वाचा हंगाम वाया गेल्याने मासळी व्यावसायिकांबरोबरच सप्लायर्स, निर्यातदार, छोटे-मोठे व्यावसायिक त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आहे.
बूमच्या वादात ससून डॉक बंदरात पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ४०० मच्छीमार बोटींपैकी जवळपास २०० मच्छीमार बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. अद्ययावत यांत्रिक बूमद्वारे मासेमारी केल्याने मासळीचे उत्पादन कमी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बहुतांश मासळी व्यावसायिकांनी पारंपरिक मासळी व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पावर ब्लॉक यंत्रणा न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दुखावलेल्या खलाशीवर्गाने असहकार करत बूम नाही तर काम नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे. पर्ससीन नेट मासेमारी बंद पडल्याने चार महिन्यात सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
दुसरीकडे मुंबई-रायगडमधील सुमारे ३३ पर्ससीन नेट मासेमारी बोट मालकांनी बोटींवर अद्ययावत यांत्रिक बूम बसवून बिनदिक्कतपणे मासेमारी सुरू केली आहेत. ससून डॉक, मिरकरवाडा, श्रीवर्धन, विजयदुर्ग आणि सातपाटी याच बंदरात पर्ससीन नेट व्यावसायिकांना मासळी उतरविण्याची परवानगी आहे. मात्र यांत्रिक बूमचा वापर करुन पर्ससीन नेट व्यावसायिक पकडलेली मासळी स्थानिक बंदर आणि मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना हाताशी धरीत जांभारी-जयगड, चिंचबंदर, रेवदंडा, जंगल जेट्टी दिघी, आगरदांडा, रत्नागिरी आणि त्यामधील छोट्या-छोट्या बंदरात बेकायदेशीरपणे उतरवित आहेत आणि मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत.
सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरुन काही बूमधारक मासळी व्यावसायिक रात्रीच्यावेळी ओएनजीसीच्या रिंगजवळ जावून मासेमारी करीत आहेत. खोल समुद्रात सुरु असलेल्या मासेमारीमुळे ओएनजीसीलाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. यांत्रिक बूमद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे मासळी उत्पादनही कमी होत असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होवू लागली आहे.