किनारी गावांना उधाणाचा तडाखा, घरांचे नुकसान, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:57 AM2018-07-16T02:57:50+5:302018-07-16T02:57:53+5:30
जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा रविवारी उसळल्या.
अलिबाग : जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा रविवारी उसळल्या. फेसाळलेल्या लाटांचा थरार पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीही अलिबागच्या समुद्रकिनारी मोठी गर्दी केली होती. लाटांचा तडाखा एवढा भयंकर होती की, किनाऱ्यावरील संरक्षक बंधारे ओलांडून समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरले. किनारी भागामधील गावांतील घरांना त्याचा चांगलाच फटका बसला. समुद्राचे रौद्ररूप पुढील दोन दिवस असेच कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यात उधाणाच्या लाटा सर्वाधिक उंच असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दुपारी १२च्या सुमारास समुद्र खवळलेला असल्याने भरतीचा जोर प्रचंड वाढला होता.
लाटांनी संरक्षक बंधारा ओलांडल्याने किनारी लोकवस्तीत सर्वत्र पाणीच पाणी झाले. अलिबाग संरक्षक बंधाºयांना असणाºया पायºयांवर बसून बच्चे कंपनीने पावसासह समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, समुद्राचे उधाण पुढील दोन दिवस असेच कायम राहणार असल्याने उंच लाटांचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही लाटांचे शहारे अंगावर घेण्यासाठी तरुणाई गर्दी करीत आहे.
>नऊ सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे सहा लाख रुपयांचे, तर १६१ खासगी मालमत्तेचे ६९ लाख ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान ७५ लाख ४१ हजार रुपये.
>महाड येथे घर पडले; गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल जळून खाक
महाड : सोसाट्यांच्या वाºयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील खुठील हनुमानवाडी येथील बळीराम देऊ जगताप यांचे घर कोसळले, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील सव येथील जाधव यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठ्यातील दोन बैलांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांचे पंचनामा करण्याचे काम तहसीलदार स्तरावरून सुरू आहे.
>नुकसानग्रस्तांना
८ लाखांची मदत
पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामध्ये तीन जणांचा पुराच्या पाण्यात वाहून, तर एकाचा दगड खाणीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. पैकी तीन पात्र प्रकरणांमध्ये दोघांना आठ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सात मोठी दुधाळ जनावरे मरण पावली, तर दोन लहान दुधाळ जनावरे आणि ओढकाम करणाºया दोन मोठ्या जनावरांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामध्ये फक्त एकाच प्रकरणामध्ये ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
पावसाची हजेरी
रेवदंडा : विश्रांतीनंतर शनिवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. दुपारी भरतीच्या वेळी किनाºयावर लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी किनारी भागात गर्दी केली होती. कोळीवाड्यात दुपारी नेहमीप्रमाणे व्यवहार दिसत होते. कुठेही नुकसान झालेले नाही.