पोलादपूर : पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात. महाडची दुर्घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही. बोरावळे गावच्या हद्दीतील एका पुलाची (साकव) दुरवस्था झाली असून, त्या पुलाचा पायाच सरकला आहे. यामुळे येथे कधीही पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्रुपग्रामपंचायत बोरावळे हद्दीतील चाळीचाकोंड, बोरावळे गावठाण गुडेकरकोंड, मोरेवाडी, खोतवाडी, कोडबेकोंड या नागरिकांना साखर पितळवाडी व तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता कामथी नदीवर लोखंडी पूल (साकव) आहे. त्या पुलाचा पाया सरकला असून तो एका बाजूला तिरपा झाल्याचे स्थानिक ग्रामस्थाचे म्हणणे आहे.पुलाच्या सुरुवातीच्या भागात खालच्या बाजूने भगदाड पडल्याचे दिसते. हा पूल अनेक वर्षांपासून गंजलेला आहे. तो केव्हाही कालबाह्य होऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या आपत्तीस कारणीभूत ठरू शकतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून स्थानिक या पुलावरून प्रवास करतात. या पुलावरून माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये जवळजवळ २५ विद्यार्थी तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता व जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून आजही प्रवास करताना आपणास पाहावयास मिळत आहेत.ग्रामस्थांकडून वारंवार पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला असून शासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक यामुळे हवालदिल झाले असून, काही जणांचा जीव गेल्यावरच या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार का? असा संताप स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त के ला जात आहे.बोरावळे-साखर यांना जोडणारा हा पूल ३० ते ३५ वर्षांपासून असून, त्या वेळी पोलादपूर-बोरावळे रस्ता तसेच बोरजफाटा ते चाळीचाकोंड जोडरस्ता नसल्याने सर्व ये-जा याच पुलावरून व्हायची. मात्र, आता नवीन मार्ग झाले, त्यामुळे प्रत्येक वाडी-वस्तीवर वाहने पोहोचली. मात्र, अजूनही काही लोक असे आहेत की, त्यांना वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने व सर्वात सोयीचा पर्याय म्हणून याच पुलावरून जाणे भाग पडते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुलाची अवस्था पाहता पालकांनासुद्धा आपली मुले घरी आल्याशिवाय चैन पडत नाही.
बोरावळे पूल धोकादायक : विद्यार्थी, ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 3:13 AM