बोर्लीपंचतन परिसर ३६ दिवसांपासून अंधारात, महावितरणविरोधात संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:48 AM2020-07-10T00:48:49+5:302020-07-10T00:49:02+5:30
सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे.
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात ३६ दिवस वीजपुरवठा नाही. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणविरोधात थेट पोलीस स्टेशनच गाठले. दिघी सागरी पोलिसांनी मध्यस्थी करीत पोलीस, ग्रामस्थ व महावितरण यांच्यात गुरुवारी सकाळी समन्वय बैठक आयोजित केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.
सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे. परिणामी, कुठे अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या वेळी स्थानिक राजकीय नेते मंडळी व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थ यांची सभा घेण्यात आली. या वेळी सर्वांकडून समस्या मांडण्यात आल्या.
गावोगावी नेमणूक असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. विद्युत खांब उभे करण्यासाठी प्रत्येक गावातून दोनशेहून अधिक ग्रामस्थांचे श्रमदान मिळत असताना अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होत नाही. म्हसळा, मेंदडी, गोंडघर येथे सबस्टेशन होणारी मुख्य वाहिनीची कामे होत असताना गावा अंतर्गत कामे
रखडली आहेत. अनेक विद्युत खांब कोसळलेल्या स्थितीत असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत.
यामुळे विद्युत पुरवठा स्थिर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
महावितरणकडून अधिकची बिले आली. ती भरली नाहीत म्हणून वीज जोडणी तोडायला कुणी आले तर आम्ही कर्मचाºयांना ते करू देणार नाही, असा आक्रमक इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.
‘आठ दिवसांत वीज येणार’
निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. जवळपास सर्वच गावांना या आठ दिवसांत वीज सुरळीत मिळेल, अशी माहिती श्रीवर्धनचे उपअभियंते महेंद्र वाघपैजन यांनी दिली.