बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पुरतेच हैराण झाले आहेत. मात्र ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नाही. मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ साली झाली असून या पंचायतीच्या हद्दीत बोर्ली, कोल मांडला, सुरई, सुरई आदिवासी वाडी, ताराबंदर (नवी बोर्ली) आदी गावांचा समावेश आहे.ग्रामपंचायती लोकसंख्या ही साडेचार हजारच्या आसपास आहे. साळाव-मुरुड या राज्य महामार्गावरून बोर्ली गावात येणाऱ्या फाट्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली दूरक्षेत्रपर्यंतचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत येत असून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे बोर्ली गावातील रामवाडी परिसरातील तळा विहीर येथे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने त्यांचा खांब उभारलेला असल्याने ये-जा करताना वाहनांना त्याचा त्रास होत आहे. बोर्ली एसटी स्थानकातून गावात येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जुना बाजार परिसरात साने गुरुजी विद्यालयाच्या बाजूने समुद्राकडे जाणारा रस्ता तसेच बोर्ली मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ, जुन्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यापासून गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोर्ली गावात पाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी हे रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे तसेच सिमेंट काँक्रीट रस्त्यावर शेवाळ पसरले आहे. यामुळे घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. बोर्ली ग्रामपंचायतीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी तीन चाकी सायकल आणली होती. मात्र आता तीसुद्धा भंगारात गेली आहे. बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत महामंडळाची स्ट्रीट लाइट सुध्दा बंद आहे. (वार्ताहर)
बोर्ली विविध समस्यांच्या विळख्यात
By admin | Published: August 11, 2015 12:22 AM