कर्जत : रस्त्याची खोदाई करताना कर्जत नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उखडल्याने कर्जतकर दोन दिवस पाण्याविना आहेत. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाचा समन्वय नसल्याने नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.कर्जत नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना पेज नदीवर आहे, पेज नदीवरून कर्जत शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. हे अंतर सुमारे ९ किमीचे आहे. खोपोली (हाळ) ते मुरबाड हा रस्ता कर्जत तालुक्यातून जात असून तो राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचे काम महाराष्ट्र स्टेट डेव्हलमेंट कॉपोरेशनच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून सुरू आहे. रस्त्याची खोदाई करताना कडाव गावाजवळ नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उखडल्याने कर्जतकर दोन दिवस पाण्याविना आहेत. तसेच कर्जत नगरपरिषद हद्दीतही रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. येथेही रस्ते खोदाई सुरू असल्याने बरेच वेळा गावातील त्या - त्या परिसरातील जलवाहिन्या उखडल्या जात आहे. त्या परिसरात सुद्धा नागरिकांना पाणी मिळत नाही.खोदाई करताना संबंधित ठेकेदाराने, पाणीपुरवठा, वीज वितरण कंपनी, दूरध्वनी सेवा यांच्याशी संवाद साधून किंवा पूर्वनियोजित कल्पना देऊन रस्ते खोदले पाहिजेत, जेणेकरून त्या त्या खात्याचा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहील व रस्त्याखालून गेलेल्या केबल अथवा जलवाहिनीची माहिती देईल. मात्र त्यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कर्जतमधील जलवाहिनी उखडली, कर्जतमधील जलवाहिनी उखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 4:15 AM