तळा शहराला दरराेज मिळणार १३५ दशलक्ष लीटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:16 AM2021-02-13T01:16:01+5:302021-02-13T01:16:09+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा विभागाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगडः तळा शहराला वावे धरणातून १३५ दशलक्ष लीटर पाणी मिळणार असल्याने, येथील पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. तसे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. गुरुवारी मंत्रालयामध्ये रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तळा शहराच्या पाणी प्रश्न साेडविण्याबाबतचे निवेदन दिले. त्यानंतर, पवार यांनी जलसंपदा विभागाला निर्देश दिले. त्यामुळे लवकरच तळा शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत हाेणार आहे.
तळा तालुका कधीच प्रकाशझाेतात आलेला नाही. सध्या या तालुक्यातही शहरीकरण वाढत आहे. तळा नगरपंचायतीला पाण्याचा प्रश्न भेडसावत हाेता. येथील पाणीप्रश्न साेडवावा, अशी मागणी सातत्याने जाेर धरत हाेती. तळ्याला दैनंदिन सुमारे १३५ दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत मुख्य अभियंता, कोकण विभाग यांना देण्यात आलेला आहे. तळा नगरपंचायती नजीकच्या तीन किलाेमीटर अंतरावर असलेल्या वावे धरणातील पाण्याचा वापर करून तळा शहरातील जनतेला पिण्यासाठी हा पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यानुसार, रायगड जिल्ह्यातील वावे धरणातील १३५ दशलक्ष लीटर पिण्याचे पाणी आरक्षित करावे, याबाबत पालकमंत्री , खासदार तटकरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना विनंती केली.
पाणी आरक्षित करावे
रायगड जिल्ह्यातील वावे धरणातील १३५ दशलक्ष लीटर पिण्याचे
पाणी आरक्षित करावे, याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार
सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली
आहे.