मधुकर ठाकूर
उरण : बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या ८० टक्के मागण्यांची पूर्तता करण्याच्या बीएमसीटीच्या आश्वासनानंतर २६ ऑक्टोंबर रोजी ११ वाहतूकदार संघटनांनी जाहीर केलेला बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती रेफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली.
जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या खासगी बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात पुर्णता अपयशी ठरले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वाहतूकदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबरपासून बंदराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची धमकी वजा इशारा कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या ११ संघटनांनी नोटीसीव्दारे दिल्याने जेएनपीएसह बीएमसीटी बंदर प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
वाहतूक संघटनांच्या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर जेएनपीए, बीएमसीटी बंदर प्रशासन आणि वाहतूकदार यांच्यात मागील तीन दिवसांपासून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जोरबैठका सुरू होत्या. या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेत वाहतूकदारांच्या ८० टक्के मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन बीएमसीटी बंदर प्रशासनाने दिले आहे.आश्वासनानंतर २६ ऑक्टोंबर रोजी ११ वाहतूकदार संघटनांनी जाहीर केलेला बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती रेफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली.