अलिबाग : एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत फक्त आश्वासने देण्यात आली, असा आरोप करून या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे रायगड अध्यक्ष दिलीप पालवणकर यांनी गुरुवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली.
एसटी महामंडळाच्या रायगड विभागात तीन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये दीड हजारांहून अधिक चालक व वाहकांची संख्या आहे. आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सेवा दिली. निवडणुकीच्या काळात कर्मचाऱ्यांसह मतपेट्यांची ने-आण करणे, कोरोना काळात परराज्यांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्याचे कामही या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, एसटी कर्मचारी शासनाच्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत.
वेतनवाढीसह सातवा वेतन आयोग मिळावा, यासाठी एसटी कर्मचारी अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र, सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील फलक अनेक स्थानकांत लावण्यात आले आहेत. ...तर मतदानाचा टक्का घसरणाररायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणेला आवाहन केले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यास मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वेतनवाढीबरोबरच सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचारी मागणी करीत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.- दिलीप पालवणवार, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना