प्रजासत्ताक दिनी ग्रामसभांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:09 AM2018-01-20T02:09:56+5:302018-01-20T02:09:59+5:30
राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे
पाली : राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे. येत्या २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी न झाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनचे दिला आहे. त्यानुसार अशा मागणीचे निवेदन सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस व पदाधिकाºयांनी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना दिले.
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती या दिवशी गावागावांत ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, अशा राष्ट्रीय उत्सवां वेळी सार्वजनिक सुटी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यातच अशा ग्रामसभां वेळी दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे, असे प्रकार होत असतात. त्यामुळे अशा राष्ट्रीय उत्सवां वेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात. येत्या २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिला. ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एकनाथ ढाकणे यांनी राष्ट्रीय उत्सवां वेळी ग्रामसभा न घेण्याबाबत ग्रामसेवक युनियनच्या डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मेपूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पद्धतीने दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी फक्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याबाबत शासनाने योग्य आदेश निर्गमित करावे, अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ढाकणे यांनी निवेदनात दिला आहे.