लग्न करताना मुला-मुलींची तपासणी गरजेची
By admin | Published: February 19, 2017 03:53 AM2017-02-19T03:53:14+5:302017-02-19T03:53:14+5:30
मुलांचे लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा मुला-मुलींची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे. शरीरातील लोहाचे प्रमाण
नागोठणे : मुलांचे लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा मुला-मुलींची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे. शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले, तर अॅनिमिया रोग होतो व त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड करणे, थकवा जाणविणे, अभ्यासात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे या सारखे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे थॅलसेमिया हा अनुवंशिक आजार आहे. या आजारावर वेळीच औषधोपचार केल्यास बरा होऊ शकतो. त्याचबरोबर मुलांनी घ्यावयाचा आहार, याची माहिती देऊन पालकांनीही मुला-मुलींची लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा त्यांची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे, असे डॉ. मिलिंद भिडे यांनी या वेळी सांगितले.
मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन आॅफ रायगड, भिडे लॅबोरेटरी सर्व्हिसेस मुंबई आणि नागोठणे मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील कार्ली येथील पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘रान पाखरं’ या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अॅनिमिया व थॅलसेमिया निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी भिडे बोलत होते. विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी व्हावी, या डॉ. अनिल गीते यांच्या संकल्पनेने ‘रान पाखरं’ आदिवासी आश्रमशाळेतील पाचवी ते दहावीच्या १५९ विद्यार्थिनींचे अॅनिमिया व थॅलसेमिया तपासणीचे निदान शिबिरामध्ये करण्यात आले व दोष असलेल्या विद्यार्थिनींना मोफत औषधे देण्यात आली. डॉ. शेळके यांनी विद्यार्थ्यांमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या नैसर्गिक बदलाची, तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या वेळी ट्रान्ससिया कंपनीचे सी.एस.ई. अतुल भिडे, नागोठणे मेडिकल असोसिएशनचे डॉ. रोहिदास शेळके, डॉ. नरेश सोष्टे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (वार्ताहर)