मोहोपाडा : नवीन नववर्षाच्या सुरुवातीपासून अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसाय धोक्यात आला असून, शासनाच्या मदतीची याचना करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच, अचानकपणे ६ ते ८ जानेवारीस झालेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला असला, तरी वीटभट्टी मालकांची आपला कच्च्या वीटा वाचविण्याकरिता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले, परंतु पावसाचा जोर इतका भयानक होता की, वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा व्यवसाय संकटात आला आहे. हवामानखात्याने आणखी पाऊस पडण्याची शक्यता जाहीर केली आहे. मोठे नुकसान होणार, या भीतिपोटी कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची धावपळ उडत असून, वीटभट्टी व्यावसायिकांना या संकटातून सावरण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.
वीट व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याने, व्यावसायिकांसह वीटभट्टीवर काम करणाऱ्या सर्व कामगारांवर मोठे संकट उभे राहिले असून, या संकटातून आम्हांला सावरण्यासाठी शासनाने रॉयल्टीमध्ये सवलत द्यावी, जेणेकरून वीट व्यावसायिकांना या नुकसानीतून सावरता येईल. - आजिम कर्जीकर, अध्यक्ष, वीट व्यवसायिक संघटना