दाढीचा बहाणा करून नवरदेव गायब, लग्नमंडपात शोधाशोध, नवरीची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:48 PM2024-01-04T14:48:45+5:302024-01-04T14:49:16+5:30
मंगळवारी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाड : किल्ले रायगड परिसरातील एका गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नऊ महिन्यांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या मांडवातून ऐनवेळी पळ काढणाऱ्या तरुणाविरोधात मंगळवारी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किल्ले रायगड परिसरातील एका गावातील २३ वर्षीय तरुणीचे कावळे तर्फे नाते गावातील प्रदीप वसंत बोराणे (२३) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधामुळे दोघांच्याही नातेवाइकांनी त्यांच्या विवाहास संमती दिली होती. त्यानुसार २७ डिसेंबरला महाडमधील एका मंदिरामध्ये त्यांचे लग्न लावण्यात येणार होते. त्यानुसार दोन्हीकडचे नातलग लग्नकार्यासाठी जमले असताना नवरदेव प्रदीप याने दाढी करून येतो, असे कारण सांगून तेथून पोबारा केला.
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
बराच वेळ वाट पाहून सर्वांनी शोध घेऊनही त्याचा काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर फिर्यादी तरुणीने त्याच्याविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. अवसरमोल करीत आहेत.