वऱ्हाडींना ट्रॅफिकने गाठले कर्नाळा खिंडीत; दोन किमीपर्यंत रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:04 AM2023-05-22T08:04:46+5:302023-05-22T08:05:06+5:30
रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : काँक्रिटीकरणामुळे सुरू असलेली संथ गतीने वाहतूक, त्यात रविवारी सकाळी बंद पडलेले दोन ट्रक, यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत रविवारी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटरपर्यंत गेल्या. रविवारी लग्न मूहूर्त असल्याने या कोंडीचा फटका वऱ्हाडींनाही बसला. यात तीन नवरदेवांची वाहने अडकून पडली होती. तसेच कोकणात, गोव्याकडे जाणारे पर्यटकही या वाहतूककोंडीमुळे प्रचंड त्रस्त झाल्याचे चित्र होते.
रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सध्या येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामामुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शनिवारीदेखील याठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती.
मुहूर्त चुकला
रविवारी लग्न मूहूर्त असल्याने वाहतूककोंडीचा वऱ्हाडी व पर्यटकांना बसला. एक नवरदेव कल्याणमधून अलिबागकडे निघाला होता. मात्र, वाहतूककोंडीत अडकल्याने लग्नाचा सकाळी ११ वाजताचा मुहूर्त काठण्यासाठी नवरदेवाला चांगलीच कसरत करावी लागली. ते कसेबसे रस्त्याच्या कडेने, गर्दीतून मार्ग काढत बाहेर पडले. रविवारी सुटी असल्याने अनेक पर्यटक रायगडमध्ये निघाले होते. त्यांनाही या कोंडीत अडकून पडावे लागले.