आसरेवाडी येथील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:01 AM2019-06-04T00:01:06+5:302019-06-04T00:01:13+5:30
दुरुस्तीची मागणी : गर्डर नसल्याने अपघाताचा धोका
मोहोपाडा : चौक आसरेवाडी हे गाव मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४ वरून सुमारे तीन किमी अंतरावर आहे. गेली चार वर्षे या गावात जाणाऱ्या रस्त्याबरोबर पूलही नादुरुस्त झाला आहे, याची गंभीर दखल शासकीय यंत्रणा घेत नसल्याने ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
आसरेवाडी हे गाव दुर्गम असून, या ठिकाणी खासगी वाहनांच्या व्यतिरिक्त कोणतेच वाहन जात नाही. गेली चार वर्षे या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांनी साम्राज्य निर्माण केले आहे. येथील नागरिक रोजगार करण्यासाठी बाहेर जात असतो, येथून वाहन चालवणे म्हणजे दिव्यच. बहुतेक मोलमजुरी करणारे कामगार सायकली किंवा दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसात या गावच्या नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्याचे खड्डे भरले होते, हे खड्डे भरणेही त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या पलीकडील होते. या रस्त्यावर नदीला मोठा पूल आहे या पुलाची उंचीदेखील मोठी असून, या पुलाला तडे गेले आहेत. त्यातून त्याच्या गंज लागलेल्या सळ्या स्पष्टपणे दिसत आहेत. पुलावर मोठे खड्डे असून पुलाला एकही गर्डर नाही. या पुलावरून ग्रामस्थांबरोबर शेतकरी व त्यांची जनावरे जात असतात, विशेष म्हणजे, येथूनच शाळेतील लहान मुलांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो.