टोळ पुलाला वाळू वाहतुकीचा फटका, स्ट्रक्चर आॅडिटचा प्राथमिक अहवाल प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:57 AM2017-11-22T02:57:42+5:302017-11-22T02:58:41+5:30
दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील.
सिकंदर अनवारे
दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील. परवाना मिळालेल्या बंदरावर यंत्रसामग्री दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे. वाळू उत्खननाला मिळालेला परवाना व्यावसायिक दृष्ट्या आनंदाची गोष्ट असली तरी वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने ज्या पुलावरून ये-जा करणार आहेत, तो टोळ पूल गेली अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चर आॅडिटच्या प्राथमिक अहवालानुसार या पुलाचा पाया धोकादायक स्थितीत आहे, तर पुलावरून वाहतुकीची क्षमता केवळ २० टन आहे. यामुळे या पुलावर होणाºया वाळू वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
महाडमधून वाहणारी सावित्री नदी, माणगाव तालुक्यातून येणारी काळ नदी यांच्या संगमापासून पुढे सुरू होणारी सावित्री आणि बाणकोट खाडी यामधील उत्खनन होणाºया वाळूला सर्वाधिक मागणी आहे. काळी दाणेदार वाळू या भागात मिळत असल्याने जिल्हा तसेच मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांची महाडमध्ये उत्खनन होणारी वाळू ही पहिली पसंती आहे. गेली १५ वर्षांपासून ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला सावित्री खाडीत बंदी होती. हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला मर्यादा असल्याने वाहतुकीचा प्रश्न गेल्या १० वर्षांत कधीही निर्माण झाला नाही. मात्र मागील महिन्यात महाराष्टÑ शासनाने आणि पर्यावरण विभागाने सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला हिरवा कंदील दिला. दोन व्यावसायिकांना ड्रेझरचे परवानेही दिले. आता ड्रेझर या अजस्त्र मशिनरीद्वारे होणारे वाळू उत्खनन टोळ परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण करेल, अशी साशंकता स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.
>खासगी सर्वेअरकडून या पुलाचे आॅडिट करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार पुलाची क्षमता २० टन असून या पुलाचा पाया म्हणजेच फाउंडेशन धोकादायक स्थितीत आहे. रेलिंग आणि पुलावरील रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. आॅडिटचा परिपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर दुरुस्तीबाबत विचार करण्यात येईल. पुलाच्या पायथ्याशी झालेल्या वाळू उत्खननामुळे पुलाला हा धोका निर्माण झाला आहे.
- संजय पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड
जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास
काळ नदीवरील या टोळ पुलाचा वापर परिसरातील नागरिक येण्या-जाण्यासाठी नेहमीच करतात. मात्र, माणूस चालत असतो, अगर गाडीवर शेजारून एखादी मोठी गाडी गेल्यावर धरणीकंपाप्रमाणे पूल हादरतो.
या हादºयामुळे लोक भयभीत होतात. काही वर्षांपूर्वी पुलाच्या काँक्रीटला मोठमोठे खड्डे आणि होल देखील पडले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पुलाची डागडुजी झाली असली तरी हा पूल धोकादायक स्थितीत नाही, याबद्दल साशंकता आहे.