खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ पूल धोकादायक अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:46 PM2020-09-05T23:46:21+5:302020-09-05T23:46:28+5:30
सावित्रीची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण? नूतनीकरणाला मुहूर्त मिळेना
बिरवाडी : खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ नदीपात्रावरील पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक विचारत आहेत,
या पुलावरून पुणे, भोर, पिंपळवाडी, गोठवली, किये, बारसगाव, खरवली, ढालकाठी, बिरवाडी, येथील नागरिक, वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात.
शालेय विद्यार्थी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे कामगार यांना याच पुलाचा वापर करून काळ नदीचे पात्र ओलांडावे लागते. सदर पूल धोकादायक असल्याने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचनाही आमदार भारत गोगावले यांनी लेखी निवेदनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. सुमारे पाच कोटी रुपये एवढा निधी शासनातर्फे या पुलाच्या नूतनीकरणाकरिता मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला मुहूर्त सापडत नसल्याची बाब समोर आली आहे .
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत नेते प्रभाकर पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या पुलाची निर्मिती केली होती.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे न झाल्याने सद्यस्थितीमध्ये हा पूल वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
पुलाच्या नूतनीकरणाकरिता रायगडचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी पावणे दोन कोटी निधी मंजूर केला होता. सदरचा निधी अपुरा पडत असल्याने गोगावले यांनी पाठपुरावा करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, तरीही या नूतनीकरणाचे काम लालफितीत अडकले आहे. या धोकादायक पुलाची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केली आहे.