- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर प्रतिवर्षी पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत आहेत. त्यापैकी सर्वाधिक खड्डे तीन वर्षांपूर्वीच बांधलेल्या पुलांवर पडत असल्याचे दिसून येत आहे, यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून पुलांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण केले आहे, यामुळे सदर मार्गावर वाहनांना गती मिळून मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा होता. त्याकरिता सहा ठिकाणी नवे पूलही उभारण्यात आले आहेत. त्यापूर्वी सायन-पनवेल मार्गावर जुई, तुर्भे, नेरुळ, सीबीडी व खारघर या ठिकाणचे पूल होते. त्यात वाशी गाव, सानपाडा जंक्शन, शिरवणे, उरणफाटा, कोपरा व कामोठे या पुलांची भर पडली आहे, यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुमारे १६ कि.मी.च्या अंतरावर ११ पूल निर्माण झाले आहेत. त्यापैकी नव्या पुलांसह बहुतांश पुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पुलावरील डांबर व खडी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने बांधकामाच्या सळई वर आल्या आहेत, यामुळे मागील चार वर्षांत सायन-पनवेल महामार्गावर उभारण्यात आलेल्या पुलांचा दर्जा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, एखाद्या पुलावर भगदाड पडून मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे वर्षभरात १०० हून अधिक छोटे-मोठे अपघात घडले असून, बहुतांश अपघात पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेले आहेत. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.सायन-पनवेल मार्गासाठी सुमारे १२०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, मार्गाचा काही भाग वगळता सर्व पूल व उर्वरित रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात त्या ठिकाणचे डांबर वाहून जात असल्याने कामाच्या दर्जावर संशय निर्माण झाला आहे. यावरून अनेकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवरही धरले आहे. मात्र, त्यानंतर खात्याचे मंत्री व अधिकारी यांनी पाहणीदौरे करूनही प्रत्यक्षात मात्र गैरसोईत कसलाही सुधार झालेला नाही; परंतु वाहनचालकांकडून टोल मात्र नित्य नियमितपणे वसूल केला जात आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुविधेसाठी की पडलेल्या खड्ड्यांचा टोल भरत आहोत, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सायन-पनवेल टोलवेज कंपनी वाद सुरू आहेत. हा वाद न्यायालयात गेल्यापासून टोलवेज कंपनीने दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांना नरकयातना सोसाव्या लागत असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने खासगी कंपनीमार्फत टोलवसुली मात्र सुरूच ठेवलेली आहे.महामार्गावर गैरसोर्इंचे भांडारच्अनेक महिन्यांपासून महामार्गावरील पथदिवे बंद आहेत, यामुळे कोपरा तसेच सानपाडा पुलालगत अनेक अपघात घडले आहेत. उरण फाटा पुलाचा सुरक्षा कठडा तुटून पडलेला असतानाही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तर पादचाºयांसाठी बांधलेल्या भुयारी मार्गाच्या नियोजनातील त्रुटींमुळे ते वापरात आलेले नाहीत, यामुळे सायन-पनवेल महामार्ग वाहनचालकांसह पादचाºयांसाठी गैरसोईचा ठरत आहे.पुलाच्या उताराचे खड्डे जीवघेणेच्सानपाडा जंक्शन येथील पुलाच्या मुंबईकडे जाणाºया मार्गावर चढ आणि उतारालाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. अचानक नजरेस पडणाºया या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी एखाद्या दुचाकीस्वाराने ब्रेक दाबल्यास त्याला पाठीमागून येणाºया भरधाव वाहनाची धडक बसण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारातून शिरवणे पुलावर एका दुचाकीस्वाराला डम्परची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.खळखट्याकचाही परिणाम नाहीसायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात घडून इब्राहिम खुर्शीद (५८) व सनी विश्वकर्मा (२७) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यामुळे गतमहिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतरही खात्याच्या मंत्री व अधिकारी यांच्यावर फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आहेत. तर अद्यापही अपघातांची मालिका सुरूच असतानाही राजकीय पक्षांनी बाळगलेले मौन संशय निर्माण करत आहे.
महामार्गावरील पुलांचा खर्च खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:17 AM