- आविष्कार देसाईअलिबाग : तालुक्यातील खंडाळे-पवेळे गावांना जोडणारा सुमारे ४० वर्षे जुना पूल रविवारी दुपारी पडला. त्यामुळे तब्बल एक हजार नागरिकांचा संपर्क तुटला होता, तर सुमारे २०० पर्यटक सिद्धेश्वरच्या डोंगरावर अडकून पडले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी पायी वाट करून पर्यटकांचा मार्ग सुकर केला. मात्र पर्यटकांच्या दोन बस आणि चार गाड्या पवेळे - सिद्धेश्वराच्या पायथ्याशी अद्यापही अडकल्या आहेत. सध्या पुलावर भराव टाकून तात्पुरता रस्ता उभारण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सागर पाठक यांनी दिली.पूल पडला तेव्हा पुलावर कोणीच नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पूल पडून चार तास झाले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी पोचले नव्हते.अलिबागपासून खंडाळे सुमारे पाच किमी आहे. खंडाळे स्टॉपपासून पवेळे गावात जाण्यासाठी फाटा आहे. त्याचमार्गावर हा जुना पूल आहे. गेल्या काही महिन्यांपासून याच पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जात होती. रविवारी सकाळी सुध्दा याच पुलावरून सिमेंटची अवजड वाहतूक सुरू होती. त्यावेळी गावातील तरुण जितेंद्र मळेकर यांनी संबंधित चालकाला पूल कमकुवत असल्याचे सांगितले, मात्र त्याने ऐकले नाही.सकाळी अकराच्या सुमारास पुलाला मोठी भेग पडली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान पूल खाली कोसळला. जवळच्या शेतामध्ये प्रतीक पाटील हा तरुण काम करत होता. त्याचवेळी गावात जाण्यासाठी सचिन बहीरोळकर त्याच पुलावरून जाणार होता. त्या आधीच पूल खाली कोसळला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तातडीने याची माहिती गावातील नागरिकांना दिली. मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी चार तासांनंतर तेथे पोचलेला नव्हता. खंडाळेच्या सरपंच रंजना नाईक, उपसरपंच संतोष कनगुटकर, विजय पाटील, नाशिकेत कावजी यांनी पाहणी केली.पूल पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागालाही नव्हती. ‘लोकमत’ने याबाबतची माहिती दिल्यानंतर आपत्ती विभागाचे सागर पाठक यांनी तातडीने मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. सध्या पुलावर भराव टाकून तात्पुरता रस्ता उभारण्यात आला आहे.पवळे गावातील रुग्णांना अलिबाग, खंडाळेत जावे लागतेपवेळे गावाची लोकसंख्या सुमारे ८०० आहे. ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी याच पुलावरून ये-जा करावी लागते. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा आसरा होता. पूल पडल्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. पवळे गावामध्ये दवाखाना नाही. छोट्या-मोठ्या आजारावार उपचारासाठी त्यांना खंडाळे आणि अलिबाग याच ठिकाणी यावे लागते. गावामध्ये किराणा सामानाची दोनच छोटी दुकाने आहेत.सिद्धेश्वरच्या प्रसिद्ध मंदिराकडे जाण्यासाठी याच गावातील पुलावरून जावे लागते. रविवार असल्याने तेथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. पूल पडल्यामुळे सुमारे २०० पर्यटकांना सिद्धेश्वराच्या पायथ्याशीच थांबावे लागले. ग्रामस्थांनी त्यांना पुलावरून जाण्यासाठी वाट करून दिली. परंतु त्यांच्या दोन बसेस, चार गाड्या आणि काही दुचाकी पायथ्याखालीच ठेवाव्या लागल्या. पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर तेथून वाहने सोडण्यात येणार आहेत.
सिद्धेश्वरला जाणारा पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 3:05 AM