मुठवली कालवण नदीचा पूल खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:59 AM2018-08-07T02:59:16+5:302018-08-07T02:59:20+5:30
मुठवली-कालवण-पाणसई या गावांमध्ये जाणारा कशेणे गावाजवळच्या रस्त्याची तसेच नदी पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.
गिरीश गोरेगावकर
माणगाव : तालुक्यातील मुठवली-कालवण-पाणसई या गावांमध्ये जाणारा कशेणे गावाजवळच्या रस्त्याची तसेच नदी पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावरून कोकण रेल्वेचे काम करणाºया एका ठेकेदाराने अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाचा काही भाग खचला आहे. त्यामुळे परिसरातील चालक तसेच नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
पूल कोसळल्यास चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पुलाच्या दुरुस्तीबाबत तहसीलदार तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र तरीही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी तसेच चार गावांतील मुलांना शिक्षणासाठी नदी पूल ओलांडून जावे लागते. याशिवाय रात्री अपरात्री कोणी आजारी पडला तर त्याला जाण्यासाठी कुठला पर्यायी मार्गच नसल्याने याच खचलेल्या नदीपुलावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. पुलाची वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, तसेच जीवितहानी होऊ शकते. पुलाच्या बाजूलाच कशेणे रेल्वे कारशेड स्थानकाचे मोठे काम होत असून रेल्वे रु ंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे पुलावरून बांधकामासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांतून पुलावरून ने-आण केले जाते. जून महिन्यात हा पूल खचला. अवजड वाहनांमुळे हा नदी पूल व रस्ता खराब झाला असून रेल्वेचे काम करीत असलेला ठेकेदारच यासाठी जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी ठेकेदाराला रस्ता आणि पुलाच्या दैनावस्थेबाबत जाब विचारल्यावर, ठेकेदाराने रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली. पूल मात्र अद्याप खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.