चिपळे येथील गाढी नदीवरील पूल धोकादायक झाल्याचा वाहनांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:58 AM2020-12-14T00:58:22+5:302020-12-14T00:58:25+5:30
वाढत चाललेल्या वाहतुकीमुळे नदीवर दुसऱ्या पुलाची आवश्यकता भासू लागलेली आहे. पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पजून गंजू लागले आहेत.
नवीन पनवेल : चिपळे येथील गाढी नदीवर बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. २०१८ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, २ वर्षे उलटली, तरी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
पुलाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाची लांबी ६६.०० मीटर, रुंदी ६.७० मीटर तर उंची ६.१० मीटर आहे. वाढत चाललेल्या वाहतुकीमुळे नदीवर दुसऱ्या पुलाची आवश्यकता भासू लागलेली आहे. पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पजून गंजू लागले आहेत. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी २३ लाखांचे टेंडर काढले. मात्र, १९ लाख ४६ हजार रुपयांचे काम सुभाष एंटरप्रायझेसला देत १९ एप्रिल, २०१९ला पुलाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. आतापर्यंत ३० टक्के पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. ठेकेदार काम करत नसल्याने बांधकाम विभागाने सुभाष एंटरप्रायझेसना ३ नोटिसा पाठविल्या आहेत. तरीही कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.
लोखंडी सळ्या बाहेर
पुलाच्या खालील बाजूस लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. तालुक्यातील चिपळे, कोप्रोली, नेरे, शांतीवन, उमरोली, गाढेश्वर, वाजे, धामनी, धोदाणी या गावांसह अनेक आदिवासी वाड्याना जोडणाऱ्या या पुलाची डागडुजी होणे गरजेचे आहे.