गोद नदीवरील पूल जीर्णावस्थेत, ब्रिटिशकालीन पूल कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:11 AM2019-08-03T01:11:49+5:302019-08-03T01:12:05+5:30
झाडे वाढली : ब्रिटिशकालीन पूल कमकु वत
माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावनजीक असलेला गोद नदीवरील कळमजे येथील पूल ब्रिटिशकालीन असून, त्याला शंभर वर्षे होऊन गेली आहेत. हा पूल जीर्ण झाला आहे. पुलावर मोठी झाडेझुडपे वाढल्याने त्याची मुळे भिंतीमध्ये जाऊन हा पूल कमकुवत झाला आहे, तसेच जुने दगडी बांधकाम असून, त्याची डागडुजी अद्यापही केलेली दिसत नाही. हा पूल जुना झाला असून, अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे. यामुळे पूल हेलकावे खात असल्याचे कळमजे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाला असून, भविष्यात या पुलावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे, तसेच या नदी पुलाच्या बाजूने मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वे रुंदीकरणाचे काम चालू आहे. मातीचे मोठे भराव केल्याने अतिवृष्टी झाल्याने या नदी पुलाखाली जोरदार पाण्याच्या प्रवाह सुरू असून, या पुलाला मोठा धोका जाणवू लागला आहे. भविष्यात महाडमधील सावित्रीपूल दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गोद नदीचे येणारे पाणी हे पूर्णपणे या नदी पुलावर अडले जात असून, पुलाच्या स्प्रिंगिंग लेव्हलवर पातळी गेली, तर सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावरील वाहतूक थांबविण्यात यावी, असे पत्र उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता महाड कार्यालय प्रमुख पी.पी.गायकवाड यांनी या पुलाबाबत माणगाव तहसीलदारांना २७ जुलै लेखी कळविले होते.
तसेच यावेळी पत्राची दखल घेऊन माणगाव तहसील, माणगाव पोलीस यांनी पुलाची पाहणी केली होती. या पुलावर त्यांनी बंदोबस्तासाठी ताबादेखील घेतला होता, परंतु पाण्याची पातळी कमी झाल्याने या गोद नदीवरच्या पुलाची वाहतूक ही २७ जुलै दिवसरात्र चालू ठेवण्यात आली असली, तरी हा ब्रिटिशकालीन पूल मात्र भविष्यात धोकादायक होण्याआधीच संबंधित अधिकारी व प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.