इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:25 AM2020-02-01T00:25:55+5:302020-02-01T00:26:38+5:30
नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे.
- प्रकाश कदम
पोलादपूर : ऐतिहासिकदृष्ट्या पोलादपूर तालुका नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड व प्रतापगडमधील दुवा म्हणजेच पोलादपूर. या तालुक्यात शिवकाळातील अनेक रत्ने होऊन गेली आहेत. पोलादपूर तालुक्याचे स्फूर्तिस्थान व शिवरायांचे बालसवंगडी, स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, शिवभारतकार कवींद्र परमानंद स्वामी, स्वराज्याचे चिटणीस बालाजी आवजी चित्रे यांच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका म्हणजे पोलादपूर.
नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. समाधीस्थळ, आसपास लागणारे दगड घडविण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील संजय गाडीवडर, आकाश राचू गाडीवडर, केपू कडापगोळ, संजय कुराडे, गोटू गाडीवडर, उमेश गाडीवडर, अनिल गाडीवडर, उदय चौगुले इत्यादी करत आहेत.
येत्या १७ फेब्रुवारी रोजी तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी आहे. पोलदपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर उमरठ गाव आहे. या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मालुसरे कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारतीर्थ पडले. त्यांचे पार्थिव कोंढाणा किल्ल्यावरून मढेघाट मार्गे उमरठ येथे आणण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी समाधी सुशोभीकरणासाठी तरतूद केली. समाधीस्थळ सुशोभित झाल्यानंतर शौर्यदिन उत्सवासाठी प्रभाकर पाटील यांनी कायम निधी उपलब्ध करून दिला.
यंदा तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी असल्याने समाधीस्थळाचे नूतनीकरण केले जात आहे. तसेच आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या विविध विभागांतर्फे या कामासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर उमरठकडे जाणाऱ्या मार्गावर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून चंद्रकांत कळंबे यांच्या सहकार्याने नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. भविष्यात उमरठ येथे समाधी परिसरात शिवकालीन नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनातील सर्व युद्धप्रसंग शिल्पस्वरूपात उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
उमरठ गावात पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक कमान असून, एक रस्ता थेट नरवीर तानाजी मालुसरे याच्या समाधी स्थळाकडे जातो. रस्त्याच्या दुरुस्तीची दुरुस्ती , रंगरंगोटीची कामे वेगात सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची पाहणी करण्यात येत आहे. पुण्यतिथीनिमित्त सिंहगड ते उमरठ अशी दिव्य शौर्ययात्रा काढण्यात येणार असून, महाराष्ट्रातील शिवप्रेमी संस्था सहभागी होणार असल्याचे चंद्रकांत कळंब यांनी सांगितले.
- तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सांगली येथील इतिहाससंशोधक प्रवीण भोसले यांनी समाधीचे डिझाइन केले आहे. यासाठी खास कर्नाटकातून दगड मागविण्यात आले आहेत. कोल्हापूरचे कुशल कारागीर समाधीच्या नूतनीकरणाचे काम करत आहेत. समाधी परिसराला किल्ल्यासारखी तटबंदी करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे.
- समाधीस्थळाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना नरवीर पुरस्कारनेही सन्मानित करण्यात येणार आहे.