घारापुरी-राजबंदरदरम्यान धोकादायक जेट्टीला टेकू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:08 AM2020-02-18T00:08:55+5:302020-02-18T00:09:01+5:30
तात्पुरती मलमपट्टी : मेरिटाइम बोर्डाच्या अभियंत्यांकडून पाहणी
मधुकर ठाकूर
उरण : मुंबई मेरिटाइम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे शनिवारी कोसळलेल्या घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनेमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय दूर होईल, असा दावा साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी पाहणीनंतर केला आहे.
उरण, न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेणी पाहायला येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी एकमेव ५० वर्षे जुनी असलेल्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर शनिवारपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धोकादायक ठरू लागलेल्या जेट्टीमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने मोठ्या संख्येने येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी ती अत्यंत धोकादायक बनली आहे. धोकादायक ठरूपाहणाºया जेट्टीच्या दुरुस्तीकडे मुंबई मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने येणाºया हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने सुमारे ७०-८० हजार शिवभक्त बेटावर येतात. याच राजबंदर जेट्टीवरून भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते.
घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याआधीच दुरुस्तीअभावी पर्यटक आणि नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या जेट्टीची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने शनिवारी घारापुरी-राजबंदर जेट्टीचा स्लॅब कोसळला. तसेच प्लास्टरही कोसळण्यास सुरुवात झाली आहे. घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मुंबई मेरिटाईम बोर्डाचे साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या सोबत धोकादायक जेट्टीची पाहणी केली. धोकादायक राजबंदर जेट्टीची विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांना माहिती देण्यात आली आहे. देवरे यांनीही जेट्टी दुरुस्तीच्या कामासाठी अंदाज पत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर येणाºया हजारो शिवभक्तांची धोकादायक जेट्टीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती
पी. एल. बागुल यांनी दिली.