दासगांव : येथील बंदरामध्ये असलेली ब्रिटिशकालीन धर्मशाळा ही मेरीटाईम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे मोडकळीस आली असून शेवटची घटका मोजत आहे. सध्याच्या स्थितीत ही धर्मशाळा कधीही कोसळेल अशा स्थितीत आहे. येथील समाजसेवक अनंत मिंडे यांनी २०१४ मध्ये मेरीटाईम बोर्डाकडे शैक्षणिक वापरासाठी मागणी केली आहे. मात्र ही धर्मशाळा वापरासाठी ही देत नाही व या इमारतीची डागडुजी ही करत नसल्याने दासगांव ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.दासगांव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे टेहळणीचे ठिकाण होते. तर खाडीमार्गे येण्याचा शत्रूंचा दासगांव बंदर हा एकमेव मार्ग होता. त्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी दौलतगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. पूर्वी काळात खाडीत लगत असणाऱ्या गावांना गाडीमार्ग नसल्याने महामार्गाने जाण्यासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी दासगांव बंदर हे एकमेव ठिकाण होते. त्यासाठी बाणकोट ते दासगांव अशी लाँच सेवा सुरू होती मात्र लाँच सुटल्यानंतर या ठिकाणाहून जाण्यासाठी पुन्हा काही मार्ग नसल्याचे पाहता ब्रिटिशांनी दासगांव बंदरामध्ये एक धर्मशाळा बांधली. त्या ठिकाणी रात्रीच्या वस्तीसाठी लोक थांबत असत व या धर्मशाळेत लाँचचे तिकीट घर ही होते. आंबेत पूल, टोलफाटा पूल हे बांधण्यात आल्यानंतर बाणकोट विभागात जाण्यासाठी गाडी मार्ग तयार झाला. यामुळे लाँच सेवा आपोआप बंद झाली. दासगांव हे बंदर बंद झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळेचा वापर कमी झाला. मात्र ही धर्मशाळा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ताब्यात असून लाँच सेवा बंद झाल्यापासून चा धर्मशाळेकडे मेरीटाईम बोर्डाने लक्षच दिले नाही. यामुळे सध्याच्या स्थितीत ती शेवटची घटका मोजत असून कधीही कोसळेल सांगता येत नाही. दासगांव बंदरामध्ये शेकडो वर्षांपासून सुक्या मासळीचा आठवडा बाजार सुरू आहे. तसेच लाँच सेवा जरी बंद झाली असली तरी तुडील, सव गोठे, तेलंगे, वामणे, जुई, कुंबळे, रावढल या गावांना जाण्यासाठी महामार्गावरून जवळचा मार्ग दासगांव बंदर असल्याने या ठिकाणी आजही होडीची सेवा सुरू आहे. आठवडा बाजारासाठी येणाऱ्या सुकी मासळी विक्रे त्या महिलांना धर्मशाळा ही रात्रीच्या वेळी वस्तीचा एक आसरा आहे. मात्र या धर्मशाळेकडे मेरीटाईम बोर्डाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी शैक्षणिक बालवाडी किंवा इंग्रजी केजीची सोय नाही. त्यामुळे समाजसेवक अनंत मिंडे मुलांच्या शिक्षणाच्या वापरासाठी या इमारतीची मागणी मेरीटाईम बोर्डाकडे केली आहे. (वार्ताहर)शासकीय जागा असल्याने ही इमारत किंवा जागा शैक्षणिक वापरासाठी किंवा अन्य खाजगी वापरासाठी देता येणार नाही. या विभागातील नागरिकांची मागणी असेल तर पुढील बजेटमध्ये तरतूद करून या इमारतीचे काम करण्यात येईल. - किरण विजयकर,मुख्य अभियंता,महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई.
ब्रिटिशकालीन धर्मशाळेची दुरवस्था
By admin | Published: November 26, 2015 1:49 AM