माथेरानमधील ब्रिटिशकालीन शासकीय इमारती धूळ खात
By admin | Published: February 22, 2017 06:39 AM2017-02-22T06:39:24+5:302017-02-22T06:39:24+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेले अन् ब्रिटिश राजवटीत उदयास आलेल्या माथेरान या पर्यटनस्थळांकरिता त्या वेळेस ब्रिटिशांनी
माथेरान : ऐतिहासिक वारसा लाभलेले अन् ब्रिटिश राजवटीत उदयास आलेल्या माथेरान या पर्यटनस्थळांकरिता त्या वेळेस ब्रिटिशांनी उभारलेल्या अनेक शतकी पार केलेल्या हेरिटेज वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत; परंतु यातील काही इमारतींच्या देखभालीकडे संबंधित खात्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सर्वच स्तरांतून नाराजीचे सूर उमटत आहेत. तर या इमारतींकडे संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.
१८५०मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी माथेरानला प्रकाशझोतात आणल्यावर येथे ब्रिटिश काळातच धार्मिक स्थळे, शासकीय इमारती उभ्या केल्या होत्या. यांचा वापर शासकीय अधिकारी वर्गाला होत असे. यातील अधीक्षक कॉटेज, वैद्यकीय अधिकारी, वनक्षेत्रपाल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासाठी प्रशस्त खोल्याही बांधल्या होत्या; परंतु मागील दोन दशकांपासून यातील काही खोल्यांचा वापर केला जात नसल्याने त्या अत्यंत जीर्ण अन् मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे ही जागा मद्यपींचा अड्डा, तसेच गुरे उभी राहात आहेत. तर कुणी आपल्या हातरिक्षाही या खोल्यांच्या आडोशाला ठेवत आहेत, त्यामुळे हा परिसर बकाल बनला आहे. अधीक्षकांना राहाण्यास स्वतंत्र खोली नसल्याने त्यांना येथे नियमितपणे ये-जा करणे शक्य होत नाही. तसेच याचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे. यासाठी संबंधित खात्याने आपापल्या अखत्यारीत असणाऱ्या वास्तूंची योग्य जोपासना करावी, अशी माथेरानकरांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)