अलिबाग - मध्यप्रदेश राज्यात भोपाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात रायगड जिल्हा पोलीस दलातील रमेश कुथे यांनी आपली ‘‘अक्सेस कंट्रोल ’’ या प्रकारामध्ये वैयक्तीक सर्वाच्च कामगिरी करत कांस्य पदक प्राप्त करून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
मध्यप्रदेश राज्यात भोपाळ येथे १३ ते १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ६६ वा अखील भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात पोलीस आपल्या कौशल्याने घातपात कारवाया कशा पद्धतीने रोखतात याबाबत स्पर्धा घेतली जाते. या मेळाव्यात देशातील २४ पोलीस संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगडच्या रमेश कुथे यांनी महाराष्ट्र संघातून उत्तम कामगिरी करून रायगड पोलीस दलाचे नाव उंचावले आहे.
या मेळाव्यात तामिळनाडू राज्याला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले असुन महाराष्ट्र राज्यातील पोलीस संघाने १ सुवर्ण पदक, ४ रजत पदक व ६ कांस्यपदक अशी एकुण ११ पदकांसह ‘अॅन्टीसबोटेज चेक विनर्स ट्रॉफी’, ‘ सायंटीफिक एड टू इन्व्हेस्टीगेशन’ ची रनरअप ट्रॉफी मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र पोलीस संघात ३१ पोलीस अधिकारी, अंमलदार, ७ श्वान व १२ श्वान हॅंन्डलर यांचा समावेश होता.रायगड पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोह रमेश कुथे यांनी स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे प्रतिनिधीत्व करीत ‘‘ अॅक्सेस कंट्रोल ’’ प्रकारात ३ मिनीटांची प्रात्यक्षीक परिक्षा व लेखी परिक्षेमध्ये एकुण ९८.१ गुण प्राप्त करीत कांस्य पदकावर आपले नाव कोरून देशस्तरावर रायगड जिल्हयाचे नाव उंचावले आहे. पोह रमेश कुथे यांनी देशपातळीवर जावुन केलेल्या हया उल्लेखनिय कामगिरीचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. भविष्यात देखील अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करून उज्वल कामगिरी कराण्याकरीता शुभेच्छा दिल्या.काय आहे ‘‘ अॅंटी सबोटेज अॅक्सेस कंट्रोल ’’
ही स्पर्धा गर्दीमध्ये संशयास्पद वस्तु घेवून जाणाऱ्या व्यक्तीला हेरून घातपात रोखण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी आयोजीत केली जाते. या स्पर्धेत स्पर्धकाला एकुण ३ मिनिटाचा कालावधी दिला जातो. स्पर्धेपुर्वी संशयास्पद वस्तू स्वतःच्या पेहराव अथवा शरीरावर लपवून एक व्यक्ती गर्दीमध्ये मिसळली जाते. स्पर्धकाला दिलेल्या नियोजित वेळेपैकी कमीत कमी वेळेत सदर व्यक्तीला शोधून दाखवायचे असते.