ब्रिटिशकालीन पडलेला पूल तसाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:43 AM2018-05-18T02:43:10+5:302018-05-18T02:43:10+5:30
नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते.
- विजय मांडे
कर्जत : नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते. मात्र, प्रशासनाने कागदी घोडे नाचवत केवळ प्रस्ताव सादर करण्याचे काम दीड महिन्यात केले आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नवीन पूल बांधून होण्याची शक्यता मावळली आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील ७ आदिवासी वाडीमधील लोकांचा तसेच मोहाचीवाडीमधील लोकांचा वहिवाटीचा रस्ता असलेला पूल २७ मार्च रोजी दुपारी कोसळला होता. सदर पूल कोसळल्याने तेथील लोकांची गैरसोय होत असल्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे त्या भागातील ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केली होती. त्यानंतर या पुलाची मालकी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेने तत्काळ अंदाजपत्रक तयार करून पावसाळ्यापूर्वी पूल खुला होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार सुरेश लाड यांनी दिल्या होत्या. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी तिसऱ्याच दिवशी पाहणी करून पावसाळ्यापूर्वी पुलाची बांधणी पूर्ण झालेली असेल असे आदेश दिले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार यांनी काम वेळेत पूर्ण होईल, असे आश्वासन उपाध्यक्षांना दिले होते.
मात्र, मागील दीड महिन्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीही केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.अद्याप या कामाची निविदा देखील निघाली नसून पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना बांधकाम विभाग करीत असलेल्या दिरंगाईमुळे नेरळ मोहाचीवाडी भागातील लोकांचे पावसाळ्यात हाल होणार हे जवळपास नक्की झाले आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे स्पष्ट होत असताना त्या ७ आदिवासी वाड्या आणि मोहाचीवाडीमधील लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणवून घेणाºया नेरळ ग्रामपंचायतीकडून काय कार्यवाही होते? याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेरळ येथील २७ मार्च रोजी तुटलेला पूल अजूनही तसाच आहे.