भाऊचा धक्का-रेवस वाहतूकसेवा ८ सप्टेंबरपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:37 AM2018-08-31T03:37:38+5:302018-08-31T03:38:04+5:30
गणेशभक्तांना दिलासा : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूककोंडीपासून सुटका
जयंत धुळप
अलिबाग : भाऊचा धक्का ते रेवस, अलिबाग दरम्यानची सागरी वाहतूक सेवा पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. ती येत्या ८ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव वजीर बामणे यांनी दिली आहे. या सेवेमुळे गणेशभक्तांची मोठी सोय होणार असून त्यांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय वाहतूककोंडीचा त्रास वाचणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागामार्फत महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाच्या (महाराष्टÑ सागरी मंडळ) प्रत्यक्ष नियंत्रण व देखरेखीखाली, भाऊचा धक्का ते रेवस (अलिबाग) हा जलमार्ग प्रवास ९० मिनिटांचा आहे. ८ सप्टेंबरपासून या जलमार्गावर सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ही लाँच सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-रेवस या मार्गावर दर महिन्याला २७ ते २८ हजार प्रवासी प्रवास करत असतात, असे बामणे यांनी सांगितले. समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या लाँचखालील पंख्यामध्ये अडकल्याने अनेकदा लाँच बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु आता प्लॅस्टिकबंदीमुळे अशा दुर्घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच लाँचमध्ये सुरक्षासाधने उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची तपासणी १०ते १२ अधिकाऱ्यांकडून होते. दरवर्षी १७० ते १८० लाँचेसची तांत्रिक तपासणी केली जाते. त्यानंतरच लाँचला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांत प्रवासी संख्येत २५ टक्क्यांनी वाढ
भाऊचा धक्का ते मोरा (उरण) ही लाँच सेवा सध्या दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.१५ या दरम्यान सुरू आहे. पावसाळ्यानंतर भाऊ चा धक्का ते मोरा (उरण) या दरम्यान ही सेवा सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हा प्रवास ५५ मिनिटांचा असून या मार्गावर दर महिन्याला ३२ ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील प्रवासी संख्येत गेल्या पाच वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे बामणे यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी १४०
लाइफ जॅकेट, तराफे
दोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक लाँचमध्ये ८० ते १४० लाइफ जॅकेट आणि ४ ते ८ तराफे ठेवण्यात आले आहेत.
आपत्कालीन
स्थितीसाठी चार लाँचेस
मुंबई-रायगड दरम्यानची प्रवासी जलसेवा कायम निर्धोक व सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत ३ ते ४ लाँचेस निराळ्या उपलब्ध (स्टॅण्डबाय) ठेवल्या जातात. याद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते.