उरणमध्ये तरुणीची निर्घृण हत्या: महिला आयोगाकडून गंभीर दखल, चाकणकरांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:01 AM2024-07-29T00:01:58+5:302024-07-29T00:04:22+5:30
आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
Uran Murder Case ( Marathi News ) : उरण इथं एका नराधमाने २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे की, "रायगड जिल्ह्यातील उरण येथे २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद रितीने सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. अत्यंत निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांचे पथक बंगळुरूला रवाना झालं आहे. तातडीने या प्रकरणातील आरोपीला अटक करून सखोल तपास करत पुढील कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने पोलिसांना दिले आहेत," अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला. त्यात कोटनाका परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं. तिच्या कमरेवर आणि पाठीवर चाकूचे ३ वार करण्यात आले होते. यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले. तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टॅटूने तिची ओळख पटली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी संशयित म्हणून दाऊद शेखचं नाव पोलिसांना सांगितले.
दाऊद शेख हा व्यवसायाने ड्रायव्हर असून २०१८ मध्ये त्याने १५ वर्षीय यशश्री शिंदेला पाहिले आणि तिला टार्गेट करणं सुरू केले. तिला आपल्या जाळ्यात ओढत २०१९ मध्ये यशश्रीचं शारीरिक शोषण केले. कुटुंबाने दाऊदविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक करून जेलला पाठवले. मात्र जेलच्या बाहेर निघाल्यानंतर दाऊद पुन्हा यशश्रीचा पाठलाग करू लागला. दाऊदनेच तिचं अपहरण करून हत्याचा केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. आरोपी कर्नाटकात राहणारा असून त्याने मोबाईल बंद केला आहे. तो फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत.