नेरळ : कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्य मार्ग रस्त्यालगत साइड पट्टी खोदून बीएसएनएलची केबल टाकली जात आहे. या विनापरवाना खोदकाम करून टाकण्यात आलेल्या केबलबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना खोदकाम प्रकरणी साडेतीन लाखांचा दंड आकारला आहे.कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडे कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी तक्रार केली होती. माथेरान-कळंब या राज्य मार्ग १०८ वरील नेरळ-कळंब भागात रस्त्याच्या बाजूला केबल टाकण्यसाठी खोदकाम करण्यात येत आहे. बीएसएनएलने उजव्या बाजूने अनधिकृतपणे रस्त्याची साइडपट्टी खोदण्याचे काम केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. स्वतः बांधकाम खात्याचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी रस्त्याची पाहणी केली होती. त्यानुसार विनापरवाना केलेले खोदकाम तत्काळ बंद करण्याबाबत वारंवार तोंडी आणि संदर्भीय पत्रान्वये कळविले होते. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राला झुगारून पूर्वपरवानगी न घेता १२०० मीटर खोदकामास सुरू ठेवले होते. त्यामुळे बीएसएनएलला विनापरवाना खोदकामप्रकरणी तीन लाख साठ हजार रुपये भरपाई म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले, तसेच परवानगी घेऊनच काम करावे, अशा सूचना दिल्या.
नोटीस बजावलीरस्त्याच्या साइडपट्टीच्या नुकसानीपोटी येणाऱ्या खोदकामाचे बँक गॅरंटी म्हणून २५ रुपये प्रतिमीटर दराने ३० हजार आणि जीर्णोद्धार शुल्कप्रकरणी ३०० रुपये प्रतिमीटर दराने ३,६०,००० रक्क्म दंड म्हणून आकारली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल या कार्यालयामध्ये जमा करावी आणि खोदकामाकरिता परवानगी प्राप्त करून घ्यावी अन्यथा शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.