- जयंत धुळप
अलिबाग : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाजवळून जाणाऱ्या बीएसएनएलच्या पनवेल-पुणे आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद पडली आहे.बॅंक ऑफ इंडियाची 85 व अन्य सर्व बॅंकाची 350 अशी एकूण 435 एटीएम व कॅश डिपाॅझिट मशिन्स बंद पडली असल्याने जनसामान्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या माध्यमातून हाेणारे दैनंदिन तब्बल 250 काेटी रुपयांचे आर्थिक व्यवहार आज हाेवू शकले नसल्याची माहिती राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे. बॅंकामध्ये चेक क्लियरन्स देखिल हाेवू शकले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयांसह सर्व सरकारी कार्यालयातही नेट बंद असल्याने जनसामान्यांचा आॅनलाईन कामे हाेऊ शकली नाहीत.बीएसएनएलचे अभियंते दुरुस्ती कामात व्यस्त आहेत; मात्र इंटरनेट सेवा नेमकी कधी सुरु हाेईल हे सांगता येत नाही. रायगड विभागाच्या पनवेल येथील मुख्य कार्यालयात देखील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. इंटरनेट सेवा ठप्प हाेण्याची बातमी गेल्या दाेन महिन्यातील 38 वी घटना आहे.