सुधागडात सात दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:10 AM2020-11-25T01:10:01+5:302020-11-25T01:10:25+5:30
कनेक्टिंग इंडियाचा डिस्कनेक्टिंग तालुका ; कार्यालय बंद असल्याने नागरिक हैराण
n विनोद भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : सुधागड तालुक्यात पाली येथे बीएसएनएलचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. ज्या नेटवर्कनी भारतात ग्रामीण भागात मोबाइल फोन आणि इंटरनेट वापरण्याची अभूतपूर्व क्रांती केली ते बीएसएनएल आता मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत आहे. पालीतील कार्यालय फक्त नावापुरते असून महिन्यातील २० ही दिवस हे कार्यालय बंदच असते. त्यामुळे फक्त बंद कार्यालयासाठी बीएसएनएल भाडे भरते का, हा खरे तर प्रश्न आहे.
पालीतील सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये म्हणजे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, कोषागार, दुय्यम निबंधक, साहाय्यक निबंधक, पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयांत बीएसएनएलचे नेट आहे; परंतु बीएसएनएलच्या नेहमीच्या ढिसाळ कारभारामुळे बहुतेक सर्व कार्यालयांत खासगी नेट कंपन्यांचे नेटवर्क सध्या कार्यरत आहे.
सुधागड तालुक्यातील बीएसएनएलच्या रेंज नसण्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य मोबाइल वापरकर्त्याना आणि दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालय यांना बसला आहे. जे सामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क वापरतात त्यांना महिन्यातून फक्त १० ते १५ दिवसच रेंज असते, अशी तक्रार केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे रिचार्ज सुधागडवासीयांचे वाया जात असून सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालयात बीएसएनएलच्या लीज लाइन असल्याने आणि त्यांचे सर्व्हर फक्त बीएसएनएलवर चालत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकार मुंबई, पुणे येथून दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात; परंतु इंटरनेट नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या समस्येवर दुय्यम निबंधकदेखील हतबल झाले असून वारंवार अलिबाग बीएसएनएलला तक्रार करूनदेखील कारवाई होताना दिसत नाही. कोषागार कार्यालयात तर मागील १५ दिवसांपासून सर्व बिले आणि चलने नेट नसल्याने पडून असल्याची माहिती कोषागार अधिकारी गणेश रणपिसे यांनी दिली आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणीच नेटवर्क नाही तर ग्रामीण भागात कधी मिळणार, हा प्रश्न आहे.
जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे
बीएसएनएलचे कोणत्याही प्रकारचे लक्ष सुधागड तालुक्यातील समस्येकडे नाही. त्यामुळे खासगी नेट कंपन्या यांना सुधागड तालुका आंदण दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असून नेट नसल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मार्फत मिळणारा महसूलदेखील बुडत आहे आणि सामान्य माणसाचे पैसे वाया जात आहेत.
पेण आणि नागोठणे यांच्यामध्ये कासूजवळ WTR लाइनचे काम चालू असल्याने इंटरनेट आणि रेंज सुधागड तालुक्यात नाही, परंतु गुरुवारपर्यंत रेंज यायला पाहिजे होती.
- सतीश कोल्हे, एरिया नेटवर्क इंजिनीअर