बीएसएनएलची केबल तुटल्याने अलिबागमध्ये व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:54 AM2018-04-03T06:54:29+5:302018-04-03T06:54:29+5:30
जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प राहिल्याने ३१ मार्च या आर्थिक वर्षाअखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बँकांच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला, तर सोमवार सकाळपासून अलिबागमध्ये बीएसएनएलच्या कॉपर केबलला फॉल्ट आल्याने शहरातील तब्बल
- जयंत धुळप
अलिबाग - जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प राहिल्याने ३१ मार्च या आर्थिक वर्षाअखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बँकांच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला, तर सोमवार सकाळपासून अलिबागमध्ये बीएसएनएलच्या कॉपर केबलला फॉल्ट आल्याने शहरातील तब्बल १२०० लँडलाइन फोन बंद पडले. शिवाय इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे. बंद पडलेली लँड लाइन सेवा पूर्ववत सुरू होवून इंटरनेट सेवा उपलब्ध होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी आर्थिक वर्षाअखेरच्या अंतर्गत कामकाजासाठी खातेदारांचे आर्थिक व्यवहार बँकांनी बंद ठेवले असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बँकाना अंतर्गत कामेही न झाल्याने बँक अधिकारी देखील नाराजी व्यक्त करीत होते. दरम्यान, अनेक एटीएम व कॅश डिपॉझिट मशिन्स बंद पडल्याने आर्थिक व्यवहार करता न आल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला.
अलिबाग शहरातील बँकांच्या बीएसएनएल लीज लाइन्स सोमवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले. लीज लाइन्स सुरू झाल्यास संध्याकाळी एटीएम सेवा सुरू होवू शकेल, असेही सांगण्यात येत आहे.