ग्रामीण भागातून बीएसएनएलची फोन सेवा हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:08 AM2020-11-28T03:08:19+5:302020-11-28T03:08:46+5:30
महाड तालुक्यात शिल्लक राहिलेत फक्त खांब : शहरामध्ये फक्त ८५० कनेक्शनच सुरु
दासगाव : एके काळी ग्रामीण भागात आणि खेडोपाड्यांत बीएसएनएलच्या लॅण्डलाइन फोनशिवाय पर्याय नव्हता. संपूर्ण महाड तालुक्यात ६५०० ग्राहक लॅण्डलाइन फोनचा वापर करीत होते. मात्र, आज ही संख्या फक्त ८५० वर शिल्लक असून तीही शहरापुरतीच मर्यादित राहिली आहे. संपूर्ण ग्रामीण भागातून ही सेवा हद्दपार झाली आहे.
३० वर्षे मागचा काळ पहिला तर संपूर्ण भारतावर बीएसएनएल कंपनीची सेवा राज्य करीत होती. ग्रामीण भाग असो किंवा खेडोपाड्यांत या कंपनीच्या लॅण्डलाइन सेवेशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला या कंपनीची लॅण्डलाइन सेवा किंवा मोबाइल सेवा असो कनेक्शन मिळणे कठीण जात होते. तीस वर्षांच्या काळात अनेक खाजगी कंपन्यांनी टॉवर उभे करीत नागरिकांना मोबाइल सेवा देण्यासाठी या रेसमध्ये धाव घेतली असली तरी अद्याप कोणत्याच कंपनीने लॅण्डलाइन सुविधा कोणत्याही ग्राहकाला पुरविली नाही. मात्र, खासगी कंपन्यांकडून मिळणारी चांगली सुविधा आणि कमी खर्च यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचा कल याकडे वळला आणि हळूहळू बीएसएनएल मोबाइल सेवा तसेच लॅण्डलाइन सेवेची नागरिकांमधून क्रेझ कमी होत गेली.
आजच्या परिस्थितीत बीएसएनएल कंपनी ही मागे पडली आहे. महाड तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यात या कंपनीची लॅण्डलाइन सेवा वापरणारे ६५०० ग्राहक होते. आजच्या घडीला फक्त ८५० शिल्लक राहिले आहेत. तेही शहरामध्ये. ग्रामीण भागातून ही सेवा संपूर्णपणे हद्दपार झाली आहे. याचे कारण नागरिकांना पुरविली जाणारी ही सेवा वेळोवेळी योग्य प्रकारे देण्यात आली नाही. पूर्वीच्या काळात खांब टाकले जात असून त्यावरून तारा टाकून लॅण्डलाइन सेवा पुरविली जात असे. मात्र नंतरच्या काळात अंडरग्राउंड ऑप्टिकल फायबर केबल टाकून ही सेवा सुरू करण्यात आली होती. वारंवार ठिकठिकाणी रस्त्यांच्या कामांसाठी होणारे खोदकाम आणि यापासून ग्राहकांना येणाऱ्या अडचणीकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
रस्ता कामामुळे सेवा बंद
महाड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये दोन वर्षांपूर्वी काही प्रमाणात या कंपनीची लॅण्डलाइन सेवा सुरू होती. मात्र, महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामध्ये तसेच अंतर्गत होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये वारंवार केबल तुटून खंडित होणाऱ्या सेवेमुळे नागरिक हैराण होऊन सेवा बंद केली. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्ये भरमसाट येणाऱ्या बिलांमुळे कंपनीने बिल न भरणाऱ्या अनेक ग्राहकांची सेवा खंडित केली.