मुरूड जंजिरा : गतवर्षी मुरूड नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २२ कोटी इतक्या रकमेचा मंजूर करण्यात आला होता; परंतु २०१७ -१८चा अर्थसंकल्प हा १० कोटी ३५ लाख २७ हजार २५० रुपयांनी मंजूर करण्यात आला आहे. फुगवटा दाखवणारा व अंदाजित रक्कम दाखवणारे आकडे नसावेत, असा आक्षेप विरोधी पक्षांनी घेतल्यानेच अखेर १० कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. बसवण्यात आले आहे.मुरूड नगरपरिषदेचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्नेहा किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला आहे. या वेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे, लेखापाल किरण शहा तसेच सर्व सन्मानीय नगरसेवक उपस्थित होते. अर्थसंकल्पात नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी दोन लाखांची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. मंजूर अंदाजपत्रकात पाणीपुरवठा विभागाकरिता ३३ लाख १३ हजार ४५० रुपयांची तरतूद करून या रकमेतून टी.सी.एल पावडर खरेदी, इलेक्ट्रिक बिल, गारंबी धरण गाळ काढणे, अन्य महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकरिता ६ लाख ४१ हजार रुपये तरतूद आहे. आरोग्यासाठी १७ लाख ४१ हजार, दिवा बत्ती विभागाकरिता ६ लाख, महिला बालकल्याण व अपंग कल्याण निधी याकरिता अनुक्रमे ७ व ४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सदरचा हा अर्थसंकल्प कर व दर न वाढवता मंजूर करण्यात आलेला आहे. नगरपरिषदेचे महसुली उत्पन्नकरिता १ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद आहे. यामध्ये पाणीपट्टी, मालमत्ता कर, पर्यावरण स्वच्छता फी या महत्त्वाच्या बाबींवर तरतूद आहे.नगरपरिषदेच्या सभागृहाची चुकीची रचना असून सभागृहातील बैठक व्यवस्था बदलण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. लक्ष्मीखार गावासाठी स्मशानभूमी व समाज मंदिरासाठी विशेष तरतूद केली गेली असल्याचेही या वेळी मंगेश दांडेकर यांनी सांगितले. नगरसेवक मनोज भगत यांनी हा बजेट फुगवटा आणणारा असून रकमा कमी करण्यात याव्यात, अशी सूचना केली. गेल्या तीन वर्षांत मुरूड नगरपरिषदेस कोणताही निधी आलेला नाही. पाणीपुरवठा विभागाचे वार्षिक उत्पन्न अंदाजित रक्कम ५० ते ५२ लाख आहे. तर खर्च मात्र ८५ लाख होत असेल, तर मग हा तुटवडा भरून कसा काढणार? असा प्रश्न केला. या वेळी बापदेव मंदिर ते स्मशानभूमी येथे पावसाचे पाणी जाण्यासाठी गटाराच्या दोन्ही बाजूस स्लॅब ड्रेनेज व कव्हरिंगची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
दहा कोटींचा अर्थसंकल्प
By admin | Published: March 05, 2017 2:56 AM